![]()
सेनगाव तालुक्यात मांगवाडी शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रात पोलिस व महसूल विभागाच्या पथकाने छापा टाकून एक पोलकेन मशीनसह ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये २०० ब्रास वाळूचा समावेश आहे. या प्रकरणी दोघांवर मंगळवारी ता. ६ सेनगाव पोलिस ठाण्या
.
हिंगोली जिल्हयातील अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलिस अधिक्षक निलभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलिस विभागाची पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांकडून दररोज वाळू घाटावरील मार्गावर थांबून वाहनांची तपासणी केली जात आहे. या शिवाय पहाटेच्या सुमारास वाळू घाटावर जाऊन पाहणी केली जात आहे.
दरम्यान, सेनगाव तालुक्यातील मांगवाडी शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रातून पोकलेनच्या मदतीने वाळूचा उपसा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, मंडळ अधिकारी खंडेराव पोटे, जमादार टी. के. वंजारे, सुभाष चव्हाण, कातकडे, चाटसे, केंद्रेकर, गवई, कांबळे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
यावेळी पोलिस व महसूल विभागाचे पथक येत असल्याचे लक्षात येताच पूर्णा नदीपात्रात काम करणारे दोघेही फरार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक पोकलेन मशीन, तसेच नदी पात्रातून उपसा केलेली २०० ब्रास रेती, १५० ब्रास मुरुम असा ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी मंडळ अधिकारी खंडेराव पोटे यांच्या तक्रारीवरून शिवम जाधव, गजानन तुरे (रा. ब्राम्हणगाव ता. जिंतूर,जि. परभणी) यांच्या विरुध्द सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार चाटसे पुढील तपास करीत आहेत.
