Fadnavis Responds to Ajit Pawar: ‘Look in the Mirror Before Alleging Corruption’ | आरशात पाहा, मग आरोप करा: देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना एका वाक्यात वाद न वाढवण्याचा स्पष्ट संदेश; चंद्रकांत पाटलांची टीका – Pune News



पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर, या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पुण्यातील कात्रज चौकात आयोजित प्रचारसभेत

.

फडणवीस यांनी आपल्या भाषणात निवडणुकीचा उल्लेख करताना, निवडणूक रंगात येत आहे. एक दादा बोलत आहेत, दुसरे दादा बोलत आहेत. मात्र आपण जेवढे मागे जाऊ, तेवढे हे प्रकरण वाढेल, असे सांगत वाद अधिक चिघळू नये, यासाठी सूचक संदेश दिला. त्यांनी थेट नाव न घेता अजित पवारांनाच लक्ष्य केले असल्याचे स्पष्ट जाणवत होते. भाजपवर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी आपण कामाच्या जोरावर जनतेसमोर जाणार असल्याचे संकेत दिले.

याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या काळात पुणे महानगरपालिकेत झालेल्या विकासकामांवर भर दिला. पुणे हे सांस्कृतिक, औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या देशातील अत्यंत महत्त्वाचे शहर असल्याचे सांगत त्यांनी गेल्या पाच वर्षांत भाजप सत्तेत असताना शहराचा सर्वांगीण विकास झाल्याचा दावा केला. रस्ते, पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतूक आणि नागरी सोयी-सुविधांमध्ये मोठी प्रगती झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे भाजपवर आरोप करणाऱ्यांनी आधी वस्तुस्थिती तपासावी, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील वाकयुद्ध अधिक तीव्र झाले आहे. अजित पवारांनी भाजपवर कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर, भाजप नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी तर थेट अजित पवारांनाच सवालांच्या कठड्यात उभे केले आहे.

अजित पवार सत्तेत असताना विकासकामे का झाली नाहीत? – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेताना म्हटले की, अजितदादा म्हणतात पिंपरी आणि पुण्यात विकास झाला नाही. मग जेव्हा अनेक वर्ष सत्ता तुमच्याकडे होती, तेव्हा विकास का झाला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अजित पवार अनेक वर्षे सत्तेत असताना विकासकामे का झाली नाहीत, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी दिले. पाच वर्षांत भाजपने केलेल्या कामांची मोठी यादी दाखवता येईल, असे सांगत त्यांनी भाजपच्या कामगिरीवर विश्वास व्यक्त केला.

जनता खुळी नाही

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मेट्रो प्रकल्पाचा मुद्दाही उपस्थित केला. उड्डाणपूल आणि मेट्रोसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना अजित पवारांच्या काळात उशीर का झाला? असा प्रश्न त्यांनी विचारला. पुण्यात मेट्रो प्रकल्प 2001 ते 2017 या कालावधीत प्रत्यक्षात का आला नाही, यावरही त्यांनी बोट ठेवले. मेट्रो आमच्या काळात प्रत्यक्षात आली, तुमची फक्त कागदावरच राहिली, असा टोला त्यांनी लगावला. जनता खुळी नाही, तिला कोण काय काम करतंय हे चांगलं कळतं, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

संघर्ष आणखी चुरशीचा होणार

भाषणाच्या शेवटी चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना गर्भित इशाराही दिला. अजितदादा, दमानं घेऊ नका आणि हलक्यात घेऊ नका. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडे आहेत हे विसरू नका, असे म्हणत त्यांनी राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याचे संकेत दिले. एकीकडे अजित पवार भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना, दुसरीकडे भाजपने विकासाच्या मुद्द्यावरून जोरदार पलटवार केल्याने, आगामी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये हा संघर्ष आणखी चुरशीचा होणार, हे मात्र स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *