कनेरगाव शिवारात बनावट नोटा देणाऱ्या खामगावच्या दोघांना पकडले:1 लाख रुपयांच्या बदल्यात दिल्या जात होते 2.50 लाख रुपये, बासंबा पोलिसांची कारवाई

0
whatsapp-image-2026-02-26-at-115520-am_1772087378.jpeg




हिंगोली ते वाशीम मार्गावर कनेरगाव शिवारात 1 लाख रुपयांच्या बदल्यात 2.50 लाख रुपयांच्या बनावट नोटा देणाऱ्या खामगाव (जि. बुलढाणा) येथील दोघांना बासंबा पोलिसांच्या पथकाने बुधवारी ता. 25 रात्री पाठलाग करून पकडले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्याच्याकडून बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लिंगापूर येथील अंतेश्‍वर भुसारे यांच्यासोबत खामगाव येथील लखन गोपाल बजाज व विजय प्रकाशसिंग ठाकूर या दोघांनी संपर्क साधला. एक लाख रुपयांच्या बदल्यात अडीच लाख रुपये देण्याचे अमिष त्यांनी अंतेश्‍वर यांना दाखविले. त्यासाठी 1 लाख रुपये घेऊन हिंगोली ते वाशीम मार्गावर कनेरगावनाका शिवारात येण्यास सांगितले होते. त्यानुसार अंतेश्‍वर हे बुधवारी ता. 25 रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कनेरगावनाका शिवारात आले होते. यावेळी खामगाव येथून एका कारमध्ये आलेल्या लखन व विजय यांनी त्याच्यासोबत डिल करण्यास सुरवात केली. मात्र या प्रकाराची माहिती बासंबा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे, उपनिरीक्षक मदन गव्हाणे, जमादार गजानन कराळे, कैलास गुंजकर, नामदेव हाके, शेख उमर यांच्यासह गृहरक्षक दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान, पोलिसांचे वाहन आल्याचे लक्षात येताच लखन व विशाल यांनी त्यांच्या कारने पोलिसांच्या वाहनाला कट मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी फिल्मीस्टाईल पाठलाग सुरु केला. पोलिसांनी कनेरगाव नाका शिवारातच त्यांच्या वाहनासमोर पोलिसांचे वाहन आडवे लाऊन पकडले. त्यांच्या कारची तपासणी केली असता त्यात चार मोबाईल व भारतीय बच्चोंकी बँक असे नमुद असलेले पाचशे रुपयांचे पाच बंडल असे 2.50 लाख रुपये जप्त केले आहेत. या प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. खामगाव येथील दोघांनी यापुर्वीही नांदेड जिल्ह्यातील लिंगापूर येथील काही जणांची बनावट नोटा देऊन फसवणुक झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks