![]()
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आमदार रोहित पवार यांनी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तक्रार स्वीकारली नाही, असा आरोप त्यांनी केला. सरकार या घटनेला अपघात म्हणत असले तरी आम्ही त्याला सदोष मनुष्यवध मानतो, असे स्पष्ट शब्दांत राऊत म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राऊत यांनी सांगितले की, रोहित पवार काल त्यांची भेट घेतली होती. हवाई क्षेत्रातील तज्ज्ञ, वैमानिक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांशी चर्चा करून रोहित पवार यांनी सविस्तर माहिती गोळा केली आहे. दृश्यमानता, तांत्रिक बाबी, ब्लॅक बॉक्स यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी अभ्यास केल्याचे राऊत यांनी नमूद केले. सरकार याला अपघात म्हणते, पण आम्ही त्याला सदोष मनुष्यवध म्हणतो. एक सहकारी संशयास्पद परिस्थितीत गमावला आणि तरीही सरकारकडून अपेक्षित गांभीर्य दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. त्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केलेला शोक खरा होता की दिखावा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मरिनड्राईव्ह पोलिस ठाण्यात रोहित पवार तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता ती नाकारण्यात आल्याचा मुद्दाही राऊत यांनी उपस्थित केला. एका जवळच्या नातेवाईकाने अधिकृत तक्रार द्यायचा प्रयत्न केला, पण ती स्वीकारली गेली नाही. विधानभवनातून एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा फोन गेला होता का, असा संशय त्यांनी व्यक्त केला. तुमचे अश्रू मगरीचे होते का? असा सवाल करत त्यांनी सरकारवर थेट निशाणा साधला. डीजीसीएने अशा प्रकारे अनेक अप्रत्यक्ष हत्या केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. नागरी उड्डाण खात्याशी संबंधित काही राजकीय संबंध आणि व्हीएसआर कंपनीशी जोडलेले हितसंबंध याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. मोठा राजकीय बॉम्ब राऊत यांनी पुढे स्पष्ट केले की, हा केवळ अपघात म्हणून झाकून टाकण्याचा प्रयत्न होऊ नये. कुणीतरी जबाबदारी घ्यायला हवी. कुणीतरी खून केलेला आहे ना? हत्या झाली आहे, असे वक्तव्य करत त्यांनी मोठा राजकीय बॉम्ब टाकला. पवार कुटुंबीय, अजित दादांचे चाहते आणि आम्ही सर्व जण व्हीएसआर कंपनी व डीजीसीएविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी करत आहोत, असे त्यांनी सांगितले. बारामती पोलिस ठाण्यातही तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणात गृहमंत्रालय, नागरी उड्डाण मंत्रालय आणि डीजीसीएने जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी त्यांनी केली. सरकार काहीतरी लपवत आहे का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर तत्काळ कारवाईचे आदेश द्यावेत, अन्यथा जनता सरकारला माफ करणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला. सरकार काहीतरी लपवत आहे का, तक्रार नोंदवण्यास नकार देण्यामागे राजकीय दबाव होता का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. अजित पवार यांच्या मृत्यूची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी त्यांची भूमिका आहे. या सर्व आरोपांमुळे राज्यात नव्या राजकीय वादळाची चिन्हे दिसत असून पुढील काही दिवसांत या प्रकरणावरून आणखी आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.
अजित पवारांचा कुणीतरी खून केलेला आहे ना?:संजय राऊत यांचा मोठा आरोप; तुमचे अश्रू मगरीचे होते का? सरकारवर थेट निशाणा
