मनपाचे ‘तयबाजरी’ कर भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचे गाडे उचलून मोदक ठरवले जातात आणि मोठ्यांचा अतिक्रमणकडे सोयीस्कर दुर्लक्ष 


व्यावसायिकांचा प्रश्न असा आहे की, जर दररोज अधिकृत शुल्क (तय बाजारी) आकारले जात असेल, तर त्याच व्यवसायांना अतिक्रमण म्हणून कसे गणले जाते? आणि जर ते खरोखर अतिक्रमणच असेल, तर अशा प्रकारे शुल्क वसूल करण्यामागील नेमके कारण काय, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे, अशी मागणी पुढे येत आहे.

काही व्यावसायिकांनी अशीही तक्रार केली आहे की, अतिक्रमण पथकाकडून कारवाईदरम्यान पकडलेल्या गाड्या सोडण्यासाठी अनधिकृत स्वरूपात ‘मोदक’ म्हणून ओळखली पद्धत वापरली जाते,अशी खात्रीलायक माहिती मिळत आहे. मात्र, संबंधित व्यक्ती आपली ओळख गोपनीय ठेवण्याच्या अटीवरच माहिती देत आहेत.

अतिक्रमण पथकाची कारवाई कशी होते, याबाबतही काही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘अतिक्रमण विरोधी पथक’ असे लिहिलेली चारचाकी गाडी येते, त्यातून चार-पाच कर्मचारी उतरतात आणि एखादी हातगाडी पकडून तिचे साहित्य रस्त्यावर काढून ठेवून गाडी ट्रॅक्टरमध्ये टाकून नेली जाते, असे काही व्यावसायिकांचे म्हणणे आहे. विनंती केल्यास “साहेबांशी बोला” असे उत्तर दिले जाते. विरोध केल्यास सरकारी कामात अडथळा असा गुन्हा दाखल होण्याची भीती दाखवली जाते, अशीही चर्चा आहे.

दरम्यान, काही मोठ्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोरील पादचारी मार्ग आणि रस्त्याचा काही भाग व्यापून शोरूम उभारल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अशा प्रकरणांवर तुलनेने कारवाई कमी होत असल्याची भावना लहान व्यावसायिकांत आहे. प्रशासनाने सर्वांवर समान निकष लावावेत, अशी मागणी होत आहे.

काही गाड्या प्रतिष्ठितांच्या शिफारशीमुळे  सोडल्या जातात, तर उर्वरितांकडून दंड किंवा कथित रक्कम आकारली जाते, अशीही चर्चा व्यावसायिकांत आहे. दहा गाड्या पकडून दोन सोडल्या आणि उर्वरितांकडून मोदके घेतली, तर त्याचा आर्थिक परिणाम किती मोठा होतो, याचा विचार करावा, असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले.

लोकशाही व्यवस्थेत सर्वसामान्य नागरिकांना न्याय्य आणि पारदर्शक वागणूक मिळावी, अशी अपेक्षा असते. ज्यांचे खरोखर अतिक्रमण आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे आवश्यकच आहे; मात्र रोजंदारीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या लहान व्यावसायिकांवर कारवाई करताना मानवी दृष्टीकोन आणि पारदर्शकता आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. तय बाजारीच्या नावाखाली शुल्क आकारणी, अतिक्रमण कारवाया आणि कथित अनियमितता याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करून नियम सर्वांसाठी समानपणे लागू करावेत, अशी मागणी आता जोर धरत आहे.

दुसरीकडे काही श्रीमंत लोक पादचारी रस्ता खाऊन मुख्य रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे. ते अतिक्रमण या अतिक्रमण विरोधी पथकाच्या गाडीतील लोकांना दिसतच नाही काय? असा प्रश्न विचारला जात आहे. किंवा त्यांच्या साहेबांनी अगोदर पासूनच त्या अतिक्रमणकडे पाहायचे नाही असे तंत्रज्ञान त्या गाडीतील कर्मचाऱ्यांना दिले आहेत काय? एका बंदूकधारी सुरक्षा रक्षकांच्या सॊबत वावरणाऱ्या व्यक्तीचे असेच अनेक अतिक्रमण आहेत. बंदूकधारी सरकारी व्यक्ती त्याच्या सोबत असतो म्हणून त्याच्या अतिक्रमणांवर कार्यवाही होत नाही काय? असा प्रश्न विचारला जात आहे.  



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *