![]()
अमरावती शहरात दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने तीन अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे दुचाकी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक करण्यात आलेल्या चोरट्यांमध्ये साजीद उर्फ शाहरूख मन्सूर खान (वय ३०, रा. रहेमतपुरा, अमरावती), मोहम्मद नईम मोहम्मद कलीम (वय २५, रा. गवळीपुरा, अमरावती) आणि शेख इरफान उर्फ भुऱ्या शेख मन्सूर (वय ३०, रा. सादीयानगर, अमरावती) यांचा समावेश आहे. गुन्हे शाखेचे पथक फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. या तपासादरम्यान, सदर गुन्हा साजीद उर्फ शाहरूख याने त्याच्या सहकाऱ्यांसोबत केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. चौकशीदरम्यान साजीद उर्फ शाहरूखने त्याच्या सहकाऱ्यांसोबत मिळून तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याने आपल्या सहकाऱ्यांची नावेही पोलिसांना सांगितली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहम्मद नईम आणि शेख इरफान यांनाही अटक केली. या तिन्ही चोरट्यांकडून चोरी केलेल्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही यशस्वी कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कडू, विकास गुडधे, निखिल गेडाम, सागर ठाकरे आणि योगेश पवार यांनी केली.
अमरावतीत तीन दुचाकी चोरटे जेरबंद:गुन्हे शाखेने तीन दुचाकी जप्त करत गुन्हे उघडकीस आणले
