परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी ठेवा:जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा विद्यार्थ्यांना सल्ला; स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी केले मार्गदर्शन




सध्याचे युग हे प्रचंड स्पर्धेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली ध्येयनिश्चिती करून नियोजनबद्ध अभ्यास करावा. स्पर्धा परिक्षेत यश मिळविण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी ठेवली पाहिजे असे मत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. शहरातील शिवाजीराव देशमुख सभागृहात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या आर्थिक, सामाजिक वा इतर कोणत्याही परिस्थितीचा बाऊ करू नये. येणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करत ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याची तयारी ठेवावी. केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासाचे योग्य नियोजन महत्वाचे असते. या सोबतच प्रश्‍नपत्रिका सोडवितांना वेळेचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या शिवाय विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करावा. विविध पुस्तकांमधून अभ्यास करतांना चालू घडामोडींची माहिती ठेवली पाहिजे असे त्यांनी सांगितले. स्पर्धा परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात अपयश आले तरी खचून न जाता अपयश हिच यशाची पहिली पायरी आहे हे लक्षात घेऊन नव्याने जिद्दीने अभ्यासाला लागावे. या शिवाय गटचर्चेच्या माध्यमातून कठीण वाटणारे विषय अभ्यासावेत. केवळ पुस्तकीज्ञान असण्यापेक्षा व्यवहारीक ज्ञान, लोकसंपर्क, गटचर्चा देखील महत्वाच्या असल्याचेत्यांनी स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्‍नांची उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले. पुढील काळात केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगासह इतर स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले जाणार आहे. याशिवाय मुलाखतीची तयारीही करून घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *