Anjangaon Surji Mayor Gaigole informally accepted the oath | अंजनगाव सुर्जी नगराध्यक्ष गायगोलेंनी अनौपचारिकपणे स्वीकारली सूत्रे: अधिकृत पदभार पहिल्या बैठकीत, काँग्रेस-उबाठा नगरसेवक अनुपस्थित – Amravati News



अंजनगाव सुर्जी नगरपालिकेच्या स्व. भावे सभागृहात नवनिर्वाचित नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी गुरुवारी अनौपचारिकपणे पदाची सूत्रे स्वीकारली. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले होते.

.

यावेळी शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते आणि विविध नागरी समस्यांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे कार्यकर्ते मुकुंद संगई होते.

मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्ष गायगोले म्हणाले की, पक्षभेद बाजूला ठेवून अंजनगाव सुर्जीचा सर्वांगीण विकास हेच माझे ब्रीदवाक्य आहे. आगामी पाच वर्षांसाठीचा सुस्पष्ट विकास आराखडा (ब्लू प्रिंट) तयार असून, शहराला नंदनवन बनवण्याचा माझा संकल्प आहे. जनतेने दिलेल्या विश्वासाची परतफेड विकासाच्या माध्यमातून केली जाईल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे यांनी केले, तर संचालन उत्तमराव मुरकुटे यांनी केले. आभार नवनिर्वाचित नगरसेविका प्रियंका मालठाणे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

यावेळी अकबर शाह, काँग्रेसचे आशिक अन्सारी, योगिता देशमुख, मनीष मेन, उज्वला कविटकर, मोहम्मद रेहान अब्दुल मुनाफ, मोहम्मद आशिक अन्सारी, प्रियंका आवंडकर, प्रवीण नेमाडे, उमा ओळंबे, उमेश भोंडे, मुजम्मील अली, नसीमा बी., आफरीन कौसर, मुख्याधिकारी विजय लोहकरे, भाजपाचे पदाधिकारी सुधीर रसे, गजानन कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी नवनिर्वाचित सर्वच नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, काँग्रेसचे काही नगरसेवक तसेच समाजवादी पार्टी आणि शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सर्व नगरसेवकांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली. त्यांच्या अनुपस्थितीमुळे शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, निकाल लागल्यापासून २५ दिवसांच्या आत नगरपालिकेची पहिली सभा आयोजित करणे अनिवार्य आहे. या सभेची तारीख नगराध्यक्ष अविनाश गायगोले ठरवतील. या सभेची नोटीस किमान सात दिवसांपूर्वी सर्वांपर्यंत पोहोचणे बंधनकारक आहे.

पहिल्या बैठकीत उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड केली जाईल. तोच दिवस सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळाचा पहिला दिवस असेल आणि त्याच दिवशी अधिकृतपणे पदभार स्वीकारल्याची नोंदही होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *