नांदेड (प्रतिनिधी): शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान इतवारा पोलिसांनी हातात धारदार तलवार घेऊन संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका युवकाविरुद्ध कारवाई केली. आरोपीकडून सुमारे ३३ इंच लांबीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली इतवारा पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकास ५ जुलै रोजी रात्री सुमारे ९.५० वाजण्याच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार हैदरबाग पाण्याच्या टाकीजवळ हातात तलवार घेऊन एक युवक फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला.
या कारवाईत तमजीद खान अब्बास खान (वय २०, रा. पीरनगर, ह.मु. मिल्लतनगर, नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे अंदाजे ३३ इंच लांबीची लोखंडी धारदार तलवार आढळून आली. सुमारे ५०० रुपये किमतीची तलवार जप्त करण्यात आली.
या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३६/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास इतवारा पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे आणि पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण आगलावे तसेच पोलीस अंमलदार इसराईल व सुखई यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
दरम्यान, नांदेड जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही व्यक्तीकडे अवैधरित्या शस्त्र बाळगल्याची किंवा सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला कळवावी. कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
Post Views: 5
