![]()
“भाजप सरकार आमचा डीएनए ओबीसींचा आहे असे म्हणते, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात मात्र या सरकारकडून ओबीसींचे पद्धतशीर खच्चीकरण केले जात आहे,” असा आरोप काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. यशपाल भिंगे यांनी सोमवारी ता. ६ येथे केला आहे. हिंगोली येथील शासकिय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीष पाचपुते, शेतकरी नेते डॉ.रमेश शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश सराफ, मिलींद उबाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रा. भिंगे म्हणाले की, सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील सुमारे १३,००० शाळा बंद पडल्या असून याचा सर्वाधिक फटका ओबीसी समाजाला बसत आहे. महाज्योतीची अनुदाने आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बंद करण्यात आल्या आहेत.पूर्वी १,२०० विद्यार्थ्यांना दिली जाणारी फेलोशिप आता केवळ १०० विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. भाजपच्या कार्यकाळात ओबीसी वस्तीगृहांचे प्रस्ताव रखडले असून, ओबीसींच्या भविष्यावर मोठे गंडांतर आले असल्याचा आरोप त्यांनी केला. हिंदुत्वाच्या नावाखाली भाजप विविध जातींची फसवणूक करत असल्याचा आरोप करत भिंगे म्हणाले की, “एककीडे पुण्यश्लोक अहिल्यादेवींना धर्मरक्षणी म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांनी १७७१ मध्ये बांधलेला मणिकर्णिका घाट पाडण्याचे पाप करायचे, हा भाजपचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप त्यांनी केला. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरही सरकार केवळ टोलवाटोलवी करत असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्रातील मोदी सरकार ‘लिकेज सरकार’ असून या सरकारच्या काळातच विविध परिक्षांचे पेपर फुटले जात अाहेत. काँग्रेसच्या काळातील नेत्यांच्या संवेदनशीलतेची आठवण करून देताना ते म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांनी केवळ आरोपांवरून आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. याउलट, सध्याचे सरकार इतके ‘निगरगट्ट’ आहे की गंभीर आरोप होऊनही राजीनामे देण्याऐवजी पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जाऊन आनंद साजरा करत आहेत. जर तुमचा डीएनए खरोखरच ओबीसी असेल, तर तुम्ही ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री करण्याची घोषणा का करत नाही?”. मंडल आयोगाला विरोध करणारी ‘कमंडल यात्रा’ काढणारे भाजपचे लोक कधीच लोकशाहीवादी किंवा संविधानवादी असू शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. ओबीसींच्या हिताचे सर्व निर्णय केवळ काँग्रेसच्या काळातच झाले असून, आता ओबीसींना जागृत करण्यासाठी काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्रभर लढा देणार असल्याचे प्रा. भिंगे यांनी यावेळी स्पष्ट केले.
भाजपचा ओबीसी डीएनए हा निव्वळ बनाव:सरकारकडून ओबीसींचे पद्धतशीर खच्चीकरण; प्रा. यशपाल भिंगे यांची घणाघाती टीका
