![]()
राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रयत शिक्षण संस्था परिवारावर शोककळा पसरली. विमान अपघातात अजितदादाचे निधन झाल्याचे समजताच रयत शिक्षण संस्थेने अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. तसेच संस्थेचे कामकाज स्थगित करून सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली. अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त समजल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मंडळाला मोठा धक्का बसला. शाळा, महाविद्यालयांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना रडू कोसळले. सुरूवातीला त्यांचा या घटनेवर विश्वास बसला नाही. मात्र, वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावरील बातम्यांनी सर्वांनाच शोकासागरात ढकलले. अजितदादांच्या निधनाचे कटू सत्य त्यांना पचवावे लागले. अजितदादांच्या निधनाचे वृत्त समजताच साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालयावर शोककळा पसरली. अजितदादा हे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य होते. त्यामुळे तातडीने श्रद्धांजली अर्पण करून दुखवटा पाळत कामकाज स्थगित करण्यात आले. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. संस्थेच्या प्रत्येक बैठकीला अजितदादा हजर असायचे. संस्थेचा अहवाल ते बारकाईने वाचायचे. सामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी नवनवीन संकल्पना अंमलात आणण्यासाठी ते आग्रही असायचे. अजितदादांचे विमान अपघातामध्ये झालेले निधन ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ही घटना रयत शिक्षण संस्थेच्या दृष्टीने, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या दृष्टीने धक्कादायक आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी, सर्वोत्तम दर्जाचे शिक्षण उपलब्ध व्हावे, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा आणि संपूर्ण देशात महाराष्ट्राची एक स्वतंत्र ओळख चिरंतन राहावी, यासाठी अजितदादांनी दिलेले योगदान चिरंतर लक्षात राहणारे आहे. त्यांच्या दुःखद निधनाने संस्थेसह महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत रयत शिक्षण संस्थेने अजितदादांना श्रद्धांजली वाहिली आहे. साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेची २०२५-२६ सालाची पहिली बैठक १३ एप्रिल २०२५ रोजी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. त्यावेळी अजित पवार देखील उपस्थित होते. पक्ष वेगळे झाल्यामुळे काका-पुतण्याच्या संबंधात दुरावा आला होता. मात्र, दोघेही बैठकीत आजूबाजूच्या खुर्चीवर बसले होते. ग्रामीण भागातील मुलांना एआय तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता. विशेष म्हणजे अहवालातील आकडे बोट ठेऊन शरद पवारांनी अजितदादांना दाखवले होते. राजकीय आणि कौटुंबिक कटुतेनंतर तब्बल चार तास इतका प्रदीर्घ काळ काका-पुतणे त्या दिवशी एकत्र होते.
'रयत शिक्षण'चा आधारस्तंभ हरपला!:अजितदादांच्या निधनाने शोककळा, कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर; साताऱ्यातील मुख्य कार्यालय सुन्न
