![]()
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास केवळ दोन दिवस शिल्लक असताना भाजपने आपली रणनीती कमालीची आक्रमक केली आहे. उद्या भाजपची पहिली उमेदवारी यादी जाहीर होणार असून, तिकीट कापल्यामुळे निर्माण होणारी संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी पक्षाने मास्टर प्लॅन
.
मुंबईत भाजपच्या उच्चस्तरीय कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या प्रभागांमध्ये उमेदवारीवरून वाद किंवा पेच नाही, अशा सेफ वॉर्डांची यादी उद्या पहिल्या टप्प्यात जाहीर केली जाणार आहे. मात्र, ज्या ठिकाणी रस्सीखेच आहे, तिथे ‘वेट अँड वॉच’ धोरण राबवत बंडखोरांना संधी न देण्याची पक्षाची स्ट्रॅटर्जी आहे. जिल्हाध्यक्षांना सर्व उमेदवारांचे अर्ज तांत्रिकदृष्ट्या तपासून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मलबार हिल आणि दहिसरचे ‘रणशिंग’ फुंकले
या निवडणुकीत काही प्रमुख चेहऱ्यांची नावे आता जवळपास निश्चित झाली आहेत. शिवसेना ठाकरे गट सोडून भाजपमध्ये आलेल्या तेजस्विनी घोसाळकर दहिसरच्या प्रभाग क्रमांक 2 मधून नशीब अजमावणार आहेत. दुसरीकडे, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मलबार हिल मतदारसंघात भाजपने आपले चार शिलेदार निश्चित केले आहेत. अजय पाटील, संतोष ढाले, स्नेहल तेंडुलकर आणि सन्नी सानप हे चारही उमेदवार उद्या आपले अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
मुंबईत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्रितपणे रिंगणात उतरत असली, तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार देऊन आव्हान उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर, मोठ्या सभांऐवजी छोट्या कोपरा सभा आणि थेट मतदारांच्या घरापर्यंत जाऊन संपर्क साधण्याच्या सूचना आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पुढील 48 तास मुंबईच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.
