बदलापूर प्रकरणाची अजित पवारांकडून गंभीर दखल:शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी 'कडक' नियमावली; शिक्षण विभागाला दिले निर्देश




बदलापूर येथील लहान मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे.भविष्यात लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी आणि पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांना दिले आहेत. कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष व शिक्षण समिती सभापती श्रीमती प्रियंका आशिष दामले यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आणि त्याबाबत निवेदन सादर केले. बदलापूरमध्ये पूर्व प्राथमिक शाळेतील चिमुकलीवर झालेली लैंगिक अत्याचाराची घटना अत्यंत संतापजनक, धक्कादायक आहे.लहान मुलांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पूर्व प्राथमिक शाळा, मुलांसाठीची वाहतूक व्यवस्था आणि शाळा व्यवस्थापनासाठी कडक व स्पष्ट प्रमाणित कार्यपद्धती (SOP) तयार करावी व त्या संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे सादर करावा असे निर्देश शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांना देण्यात आले आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. दोषींना कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घातलं जाणार नाही. लहान मुलांची सुरक्षितता, पालकांचा विश्वास आणि शाळांमधील सुरक्षित वातावरण राखणं ह्या बाबी अनिवार्य आहेत. बदलापूर येथील प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, आरोपीला कठोरात कठोर कायदेशीर शिक्षा दिली जाईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. नेमके प्रकरण काय? बदलापूर पश्चिम भागातील एका खासगी शाळेत नर्सरीत शिकणाऱ्या ४ वर्षांच्या चिमुरडीवर स्कूल व्हॅन चालकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक करत त्याच्याविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी स्कूल व्हॅनची तोडफोड करून पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने केली. शाळेतून येताना व्हॅनमध्ये मुलगी एकटीच असल्याचे पाहून चालकाने तिच्यावर अत्याचार केला. चिमुरडीने पालकांना घडलेला प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी मुख्याध्यापिकेकडे तक्रार केली. पण शाळा प्रशासनाने चालकाचीच पाठराखण केली, असा आरोप पालकांनी केला आहे. अक्षय शिंदे अत्याचार प्रकरणाच्या जखमा ताज्या बदलापूर (पूर्व) येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर (वय ३ व ४ वर्षे) लैंगिक अत्याचाराची घटना आॅगस्ट २०२४ मध्ये घडली होती. या प्रकरणी शाळेतील कंत्राटी सफाई कर्मचारी अक्षय शिंदेला अटक केली. या दरम्यान, २३ सप्टेंबर २०२४ रोजी तो चकमकीत मारला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *