![]()
महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. “शिंदे गट आणि भाजपचे नगरसेवक कैदखान्यात आहेत,” या संजय राऊतांच्या टीकेला शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी अत्यंत जळजळीत भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. “मुंबई महापालिका हातातून गेल्यामुळे आता ‘मातोश्री-२’चा खर्च कसा चालवायचा, ही चिंता ठाकरेंना सतावत आहे.” अशा शब्दांत महाजनांनी ठाकरेंच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्याचा टोला लगावला. संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या ‘कैदखाना’ आणि ‘नगरसेवक फोडाफोडी’च्या आरोपांचा समाचार घेताना प्रकाश महाजन म्हणाले की, “संजय राऊत यांची आजारपणामुळे बुद्धी भ्रष्ट झाली आहे. निवडणुकीच्या काळात सर्व नगरसेवकांनी जीवाचे रान केले आहे, त्यामुळे त्यांना एकत्र ठेवले आहे. शिवसेनेचा (शिंदे गट) एकही नगरसेवक फुटणार नाही, उलट ठाकरेंचेच नगरसेवक आमच्या संपर्कात असून ते फुटण्याची दाट शक्यता आहे.” २०१९ च्या ‘दगाफटक्या’ची आठवण भाजप आणि शिंदे गटात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप फेटाळताना महाजन यांनी उद्धव ठाकरेंच्या भूतकाळातील निर्णयांवर निशाणा साधला. “आम्ही युतीमध्ये निवडणुका लढलो आहोत आणि आम्ही शब्दाचे पक्के आहोत. २०१९ मध्ये ज्याप्रमाणे ठाकरेंनी सोबत लढून निकालानंतर दगाफटका केला, तसे आम्ही करत नाही. फडणवीस आणि शिंदे हे दोघे मिळून राज्याच्या आणि युतीच्या हिताचाच निर्णय घेतील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. बाळासाहेबांचे राजकीय वारस एकनाथ शिंदेच! प्रकाश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारल्याचा दावा केला. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील जनतेने निकालांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनाच वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा खरा राजकीय वारस म्हणून जाहीर केले आहे. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या भावाला (राज ठाकरे) फसवले, त्यामुळे त्यांच्या ६५ जागांवरून ६ जागा कशा येतात, हे त्यांनी आधी तपासावे. मीडिया त्यांच्या बाजूने असूनही त्यांना जनतेने बहुमत दिलेले नाही.” “मातोश्री-२” वरून टोला मुंबई महापालिकेवरील ठाकरेंची सत्ता संपुष्टात आल्याचा संदर्भ देत महाजन म्हणाले, “फोडाफोडीचे राजकारण त्यांनी करू नये. मुंबईकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. आता पालिकेची सत्ता गेल्यामुळे मातोश्री-२ चे मेंटेनन्स कोण करणार? हा खरा प्रश्न त्यांना पडला आहे.” हे ही वाचा… निवडणुकीतील पराभवानंतर सोशल मीडियावर टीका:रूपाली ठोंबरे यांचा संताप, ट्रोलर्सला दिला कायदेशीर कारवाईचा इशारा रूपाली पाटील ठोंबरे यांचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. अनेक युजर्सकडून त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट आणि कमेंट्स केल्या जात आहेत. या ट्रोलिंगची गंभीर दखल घेत रूपाली पाटील यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. “टीका करणे हा लोकशाहीचा भाग असला तरी, वैयक्तिक पातळीवर जाऊन चिखलफेक करणाऱ्यांना सोडणार नाही,” असे म्हणत त्यांनी थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. सायबर गुन्हे शाखेकडे या तक्रारी केल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा…
संजय राऊतांची आजारपणामुळे बुद्धी भ्रष्ट झाली:मुंबई हातातून गेल्याने मातोश्रीचा खर्च चालवायची चिंता, प्रकाश महाजनांची टीका
