हिंगोली (प्रतिनिधी) – हिंगोली जिल्ह्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेपेक्षा अधिक चर्चा आहे ती “पोलीस अधीक्षकांच्या खुर्चीच्या खेळाची”. एका जिल्ह्यात एकाच वेळी दोन पोलीस अधीक्षक कार्यरत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने, सामान्य नागरिकांपासून ते पोलीस यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेच गोंधळात सापडले आहेत.
आज पोलीस ठाण्यांमध्येच “साहेब कोण?” असा प्रश्न विचारला जात असल्याची गंभीर स्थिती आहे.
हा सारा प्रकार म्हणजे राजकीय हस्तक्षेपामुळे प्रशासनाचे कसे वाटोळे होते, याचे हिंगोलीतील जिवंत उदाहरण ठरत आहे.
एकीकडे डॉ. निलाभ रोहन कार्यालयात बसून आदेश देत आहेत, तर दुसरीकडे माजी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे प्रत्यक्ष फिल्डवर काम करताना दिसत आहेत. दोघेही सक्रिय, पण खालील यंत्रणा मात्र पूर्णपणे संभ्रमात!
या गोंधळाची सुरुवात झाली 21 डिसेंबरच्या नगरपालिका निवडणूक निकालानंतर. भाजप उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर लगेचच 22 डिसेंबरला श्रीकृष्ण कोकाटे यांची बदली करण्यात आली आणि त्यांच्या जागी डॉ. निलाभ रोहन यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
डॉ. रोहन 23 डिसेंबरला हजर झाले, मात्र त्याच दिवशी श्रीकृष्ण कोकाटे यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात (CAT) धाव घेत बदलीला स्थगिती मिळवली.
महत्त्वाचे म्हणजे, कोकाटे यांना केवळ बदलीच नव्हे तर “प्रतीक्षेत” ठेवण्यात आले होते – म्हणजे पगार घ्या, पण काम करू नका!
यावर त्यांनी ठाम भूमिका घेत स्पष्ट सांगितले –
“मला फुकटचा पगार नको, मला माझी नियुक्ती हवी.”
न्यायाधिकरणाने स्थगिती दिल्यानंतरही आजपर्यंत परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. कायदेशीरदृष्ट्या श्रीकृष्ण कोकाटे हेच पोलीस अधीक्षक असताना, नव्याने नियुक्त केलेले पोलीस अधीक्षकही हिंगोलीत कार्यरत आहेत.
मग प्रश्न उभे राहतात –
👉 आदेश कोणाचा पाळायचा?
👉 अहवाल कोणाला द्यायचा?
👉 चूक झाली तर जबाबदारी कोणाची?
या गोंधळाचे प्रत्यक्ष उदाहरण औंढा शहरातील ध्वज प्रकरणात दिसून आले. घटनेची माहिती एका अधिकाऱ्याला देण्यात आली, मात्र घटनास्थळी प्रत्यक्ष पोहोचले श्रीकृष्ण कोकाटे. कागदावर एक साहेब, प्रत्यक्षात दुसरे – असा विचित्र कारभार सुरू आहे.
न्यायालयीन स्थगितीनंतर वरिष्ठतेचा विचार करता, स्पष्ट भूमिका घेणे अपेक्षित होते. मात्र आज स्थिती अशी आहे की कार्यालयात बसणारे वेगळे आणि फिल्डवर काम करणारे वेगळे. यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिष्ठा मलीन होत असून संपूर्ण यंत्रणा हास्याचा विषय ठरत आहे.
या सगळ्यामागे राजकारण आहे, हे आता उघड गुपित झाले आहे. एका विशिष्ट राजकीय पक्षाला पोलीस अधीक्षक “अनुकूल” नाहीत, म्हणून बदलीचा हा खेळ रचण्यात आल्याची चर्चा उघडपणे सुरू आहे.
नवीन पोलीस अधीक्षक आल्यावर तो मतदारांना घाबरवून निकाल बदलणार का? – असा समज लोकशाहीत अजिबात चालणार नाही.
डॉ. निलाभ रोहन यांची ही पहिलीच जिल्हा नियुक्ती आहे. प्रशासन कसे चालते, राजकीय दबाव कसा येतो आणि तो कसा हाताळायचा – हे शिकण्याचाच हा काळ आहे. अशा वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घेणेच दीर्घ प्रशासकीय कारकिर्दीसाठी हिताचे ठरेल.
दरम्यान, पोलीस महासंचालकांनी न्यायाधिकरणात कोकाटे आजारी रजेवर असल्याचे सांगितले, मात्र प्रत्यक्षात ते हिंगोलीत काम करताना दिसत आहेत. त्यामुळे खोटे कोण बोलत आहे? हा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे.
आता सर्वांचे लक्ष लागले आहे 6 जानेवारीकडे. तोपर्यंत हिंगोली जिल्ह्याची पोलीस अधीक्षकांची खुर्ची रिकामी नाही, पण ती नक्कीच वादग्रस्त, गोंधळाची आणि अभूतपूर्व आहे.
न्यायालयाचा आदेश एकीकडे आणि सत्ताधीशांची भूमिका दुसरीकडे – या संघर्षात शेवटी कोण जिंकणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
तोपर्यंत मात्र हिंगोली जिल्हा “दोन साहेब… एक खुर्ची” या अजब प्रयोगाचा साक्षीदार राहणार आहे.
