रामद्रोह म्हणजेच देशद्रोह:श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरे सेना आक्रमक, राज्यभरातील मंदिरांमध्ये 'रामरक्षा महाआरती'चे आयोजन




अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणगीच्या आर्थिक गैरव्यवहार आणि लुटीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता थेट रस्त्यावर उतरणार आहे. या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख राम आणि हनुमान मंदिरांमध्ये ‘रामरक्षा महाआरती’ आयोजित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरे गट सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. श्रीराम मंदिर उभारणीत झालेल्या कथित लुटीचा मुद्दा लावून धरत ठाकरे गटाने भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. या आंदोलनासाठी त्यांनी “रामद्रोह आणि हिंदूद्रोह म्हणजेच देशद्रोह” अशी अत्यंत आक्रमक घोषणा दिली आहे. हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी आणि हा घोटाळा जनतेच्या दारात नेण्यासाठी ठाकरे सेनेने या धार्मिक आंदोलनाचा मार्ग निवडल्याचे बोलले जात आहे. पहिली महाआरती दादरमध्ये; उद्धव ठाकरे राहणार उपस्थित या राज्यव्यापी मोहिमेचा श्रीगणेशा मुंबईच्या केंद्रबिंदूतून म्हणजेच दादरमधून होणार आहे. येत्या रविवारी दादर (पश्चिम) येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात पहिली ‘रामरक्षा महाआरती’ पार पडणार आहे. या पहिल्या महाआरतीसाठी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे मुंबईतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत. दादरमधील या पहिल्या महाआरतीनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात अशाच प्रकारे महाआरतीचे सत्र सुरू केले जाणार आहे. ठाकरे गटाच्या या नव्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. राम मंदिर देणगी चोरी प्रकरण नेमके काय? जून महिन्याच्या सुरुवातीला राम मंदिर ट्रस्टने केलेल्या अंतर्गत ऑडिटदरम्यान दानपेटीतील रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू गायब झाल्याची बाब समोर आली होती. यानंतर मंदिर प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका कर्मचाऱ्याची हालचाल संशयास्पद आढळली. सुरुवातीला अत्यंत गोपनीय ठेवण्यात आलेल्या या प्रकरणाचा तपास आता वेगाने सुरू आहे. या गंभीर प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला घेरल्यानंतर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली. राम मंदिरातील चंदा चोरीच्या मुद्द्यावरून ७ जून रोजी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन योगी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेच्या केंद्रात अशी चोरी होणे ही चिंतेची बाब आहे. भाजपच्या ‘डबल इंजिन’ सरकारची देखरेख यंत्रणा, ड्रोन आणि दुर्बिणी जर योग्य काम करत असत्या, तर ही चोरी झालीच नसती,” असा टोला त्यांनी लगावला. पाठोपाठ आम आदमी पक्षाचे (AAP) नेते संजय सिंह यांनीही या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. दुसरीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनी कानपूर-बुंदेलखंड दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना या चोरीची कबुली दिली. सरकार या प्रकरणाबाबत पूर्णपणे सतर्क असून दोषी व्यक्ती कितीही प्रभावशाली असला तरी त्याला सोडले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. चौकशीसाठी ३ सदस्यीय ‘SIT’ गठीत ‘श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’च्या विनंतीवरून १३ जून रोजी राज्य सरकारने या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली. या उच्चस्तरीय समितीमध्ये विजय विश्वास पंत (IAS – डिव्हिजनल कमिशनर, लखनऊ), किरण एस. (IPS – पोलिस महानिरीक्षक), नील रतन (विशेष सचिव, वित्त विभाग) या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शेणाच्या ढिगाऱ्यात लपवली रोकड; १० लाख जप्त तपासादरम्यान १३ जून रोजी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंदिरातील देणगी मोजणीचे काम पाहणारा कर्मचारी लवकुश मिश्रा याच्या घरावर छापा टाकला असता सुमारे १० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. यातील काही रक्कम घरातील कपाटात तर काही रोकड चक्क गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवण्यात आली होती. या पैशांच्या स्रोताबाबत पोलिस सध्या सखोल चौकशी करत आहेत. २० हजारांचे वेतन, पण खरेदी केल्या करोडोंच्या जमिनी! या प्रकरणात लवकुश मिश्रासह आणखी एका कर्मचाऱ्याला संशयाच्या आधारे ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. हे दोन्ही कर्मचारी मंदिरातील देणगी मोजण्याचे काम करत होते आणि त्यांना प्रतिमहिना अवघे १८ ते २० हजार रुपये वेतन मिळत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांत त्यांच्या संपत्तीत झालेली अफाट वाढ पाहून तपास यंत्रणा थक्क झाल्या आहेत. माहितीनुसार, एका संशयित कर्मचाऱ्याने नुकतीच दीड कोटी रुपयांची जमीन खरेदी केली आहे, तर दुसऱ्याने सुमारे ४० लाख रुपयांचा प्लॉट घेतला आहे. ही मालमत्ता संशयाच्या भोवऱ्यात आहे. दरम्यान, राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी पाच दिवसांत दुसऱ्यांदा अयोध्येला भेट दिली. मात्र, “माझी जबाबदारी केवळ मंदिर बांधकामाच्या देखरेखीपुरती मर्यादित आहे,” असे सांगत त्यांनी या आर्थिक अपहारावर अधिक भाष्य करणे टाळले. कोट्यवधी भाविकांच्या विश्वासाशी जोडलेल्या या प्रकरणाच्या ‘SIT’ चौकशीच्या निष्कर्षाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *