Devendra Fadnavis On Mahayuti Municipal Election Victory BJP | नगरपालिका निवडणुकीत भाजपने मोडले 30 वर्षांचे रेकॉर्ड: 48 टक्के नगरसेवक एकट्या पक्षाचे, विजयाचे खरे मानकरी कार्यकर्ते – देवेंद्र फडणवीस – Maharashtra News



राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष आज नागपुरातील ‘रामगिरी’ बंगल्यावर पाहायला मिळाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकट्याने 200 पेक्षा अधिक नगराध्यक्ष निवडून आणत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. “

.

राज्यात झालेल्या नगरपरिषद आण नगरपंचायत निवडणुकींमध्ये महायुतीने घवघवीत यश संपादन केले. या निवडणुकीत भाजपचे सर्वाधित 207 नगराध्यक्ष निवडून आलेत. निवडणुकीतील विजयानंतर नागपूरमधील भाजपचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या विजयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरातील रामगिरी बंगल्यावर या विजयी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

नगरसेवकांच्या संख्येत ऐतिहासिक भर

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, 2017 च्या निवडणुकीत भाजपचे 1500 नगरसेवक निवडून आले होते. मात्र, यावेळी हा आकडा दुपटीने वाढून ३ हजारांच्या पार गेला आहे. राज्यातील एकूण नगरसेवकांच्या 48 टक्के नगरसेवक एकट्या भाजपचे आहेत. गेल्या तीस वर्षांतील निवडणुकींचा विचार केल्यास, एवढ्या मोठ्या संख्येने एकाच पक्षाचे नगरसेवक निवडून येण्याची ही पहिलीच वेळ असून, एक रेकॉर्ड आहे. ही किमया केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास आणि विकासाचे जे राजकारण सुरू केले, त्याला नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळेच शक्य झाली आहे.

विरोधकांचे बालेकिल्ले केले उद्ध्वस्त

नागपूर जिल्ह्यातील विजयावर भाष्य करताना फडणवीस यांनी ‘सावनेर’चा विशेष उल्लेख केला. “आम्ही सावनेर नगरपालिका पूर्णपणे काँग्रेसमुक्त केली आहे. जे नेते आपल्या बालेकिल्ल्यावर वर्षानुवर्षे अधिकार सांगत होते, त्यांचे किल्ले आमच्या कार्यकर्त्यांनी उद्ध्वस्त केले आहेत. काटोलचा अपवाद वगळता जिल्ह्यातील जवळपास सर्वच नगरपालिकांमध्ये भाजपने निर्भेळ यश मिळवले आहे. हा विजय म्हणजे नागरिकांनी आमच्या सरकारवर आणि कामावर दाखवलेला विश्वास आहे,” असे फडणवीस म्हणाले.

खरे मानकरी पक्षाचे कार्यकर्तेच

विजयाचा जल्लोष साजरा होत असताना फडणवीस यांनी या यशाचे संपूर्ण श्रेय पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना दिले. “कालपासून अनेक लोक माझे अभिनंदन करत आहेत, पण या विजयाचा खरा मानकरी मी नसून तुम्ही सर्व कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित प्रतिनिधी आहात. तुमच्या मेहनतीमुळेच भाजपला हा अभूतपूर्व जनादेश मिळाला आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

विजयाने मातणार नाही, माजणार नाही

आपण जिंकलेली सगळी शहरे आणि न जिंकलेल्या शहरांमध्ये आपण चांगले काम करु आणि परिवर्तन घडवून आणू. जी चांगली सुरुवात झाली आहे त्याचे प्रतिबिंब महापालिका निवडणुकांच्या निकालांमध्येही दिसेल याबाबत मला खात्री आहे. विजयाने मातणार नाही, माजणार नाही हा आपला संकल्प असला पाहिजे. निवडणुकीतला विजय ही आपल्या कामांची पोचपावती असते असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *