![]()
राज्यात सुरू असलेल्या पक्षांतर आणि फोडाफोडीच्या राजकारणावर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. “राजकारणाचा स्तर खूप घसरला असून यामागचं मूळ कारण म्हणजे पक्षांतरबंदी कायदा कमकुवत ठरला आहे,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच मुंबईतील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरही त्यांनी सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘राजकारणाचा स्तर घसरला’ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षफोडीच्या राजकारणावर केलेल्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देताना सतेज पाटील म्हणाले, राजकारणात वापरली जाणारी भाषा आणि पातळी दोन्ही घसरत चालली आहे. लोकप्रतिनिधींकडे हजारो-लाखो लोक आदर्श म्हणून पाहतात. त्यामुळे सार्वजनिक जीवनात अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, 2022 मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत वेळेत निर्णय झाले असते, तर देशभरात अशा प्रकारच्या राजकीय घडामोडींना आळा बसला असता. मात्र, कायद्याची अंमलबजावणी कमकुवत राहिल्याने फोडाफोडीचे प्रकार वाढल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईतील पावसाच्या परिस्थितीवर सरकारवर निशाणा मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर बोलताना सतेज पाटील यांनी राज्य सरकार आणि महापालिकेच्या नियोजनावर टीका केली. ते म्हणाले, 2022 मध्ये युनिफाइड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स मध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे मुंबईत एफएसआय मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आला. त्यामुळे शहराच्या विद्यमान पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येत असून त्याचे परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. “मुंबई हे बेटावरील शहर आहे. दरवर्षी मुसळधार पाऊस पडणारच आहे. त्यामुळे या शहरासाठी वेगळ्या प्रकारचे नियोजन आवश्यक आहे. सतत उंच इमारती उभारून इन्फ्रास्ट्रक्चरवर अतिरिक्त भार टाकला जात आहे. भविष्यात मुंबईत राहणे अधिक कठीण होण्याची शक्यता आहे,” असेही त्यांनी नमूद केले. ‘मुंबई-3’मध्ये विकासाला प्राधान्य द्या मुंबईवरील वाढता ताण कमी करण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. “जर मुंबई-3 विकसित करण्याचा विचार सुरू असेल, तर मोठ्या विकास प्रकल्पांना आणि उंच इमारतींना त्या भागात प्राधान्य द्यावे. विद्यमान मुंबईवरचा इन्फ्रास्ट्रक्चरचा भार कमी करण्यासाठी स्वतंत्र नियोजनाची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल? पावसाळी अधिवेशनानंतर काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल होणार असल्याच्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केले. प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांना मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्याने त्यांच्या जागी नव्या प्रभारीची नियुक्ती होऊ शकते. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे त्यांनी सांगितले. अमोल कोल्हेंबाबतच्या चर्चांना पूर्णविराम राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे खासदार अमोल कोल्हे महायुतीत जाणार असल्याच्या चर्चांनाही त्यांनी फेटाळून लावले. “अमोल कोल्हे हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे आहेत. विकासकामांसाठी सरकारशी संवाद साधणे आणि पक्षांतर करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ते पक्ष सोडतील, असे मला अजिबात वाटत नाही,” असे सतेज पाटील म्हणाले. शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांवर बोलताना त्यांनी सांगितले की, ही चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. “इंडिया आघाडीतील सर्व पक्ष एकत्र काम करत आहेत. प्रादेशिक पक्षांना देशभरात लक्ष्य केले जात असल्याने अशा चर्चा होणे स्वाभाविक आहे. मात्र, अशा कोणत्याही निर्णयावर अंतिम चर्चा दिल्लीतील पक्ष नेतृत्वाच्या स्तरावरच होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. वैद्यकीय हलगर्जीपणाच्या घटनेवर कारवाईची मागणी नवी मुंबईत चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती महिला आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरही त्यांनी संताप व्यक्त केला. “ही वैद्यकीय हलगर्जीपणाची गंभीर घटना असून दोषींवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी सरकारने प्रभावी उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी त्यांनी केली. सरकार लोकप्रतिनिधींच्या अपात्रतेबाबत नव्या तरतुदी आणण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेवर बोलताना सतेज पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा आणि विद्यमान कायद्यांचा विचार करूनच सरकारने कोणतेही नवे कायदे करावेत. जामीन आणि अपात्रता यांसारख्या विषयांवर घाईघाईने निर्णय घेणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
'राजकारणाचा स्तर खूप घसरला':पक्षांतरबंदी कायदा कमकुवत झाल्यानेच फोडाफोडीचं राजकारण, सतेज पाटलांची टीका
