![]()
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नुकताच ‘सामाजिक न्याय दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी ‘नशा मुक्त भारत अभियाना’त सहभागी होण्याचे आवाहन केले. शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांची जोपासना करण्यासोबतच या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन ते यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. सहायक आयुक्त, समाज कल्याण आणि शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती यांच्या संयुक्त विद्यमाने हा ‘सामाजिक न्याय दिन’ साजरा करण्यात आला. या निमित्ताने समता दिंडी आणि ‘नशा मुक्त भारत अभियान’ अंतर्गत प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. राजीव गांधी ॲकडमी ऑफ ई-लर्निंग स्कुल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, शिवदर्शन पूरग्रस्त वसाहत, पर्वती पायथा येथून दिंडीला सुरुवात झाली. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती पायथा येथे दिंडीचा समारोप झाला. यावेळी समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुंडे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज गुणवंत पुरस्कार प्राप्त विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मानही करण्यात आला. समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, गृहप्रमुख आणि शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनी दिंडीत मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. राधाकिसन देवढे, सहायक आयुक्त मीना आंबाडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी प्रमोद फडणीस, शाहू मंदिर महाविद्यालयाचे प्राचार्य विलास पाटील, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अरुण रोडे, फेस्कॉम, इस्कोपचे अध्यक्ष दिलीप पवार, महर्षी कर्वे समाज कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य महेश ठाकूर, तसेच श्री शिवाजी मराठा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे पदाधिकारी, आजी-माजी सैनिक महार रेजिमेंटचे सदस्य उपस्थित होते. विशाल लोंढे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. तसेच, ‘नशामुक्ती मित्र नोंदणी मोहिमे’साठी असलेल्या https://nmba.dosje.gov.in/volunteer/registration या लिंकवर अधिकाधिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात श्री शाहू मंदिर महाविद्यालय, अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज, पुणे विद्यार्थीगृहाचे कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, सर परशुराम भाऊ महाविद्यालय, आप्पासाहेब जेधे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मुक्तांगण इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, श्री शिवाजी मराठा सोसायटीचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, श्री शिवाजी मराठा सोसायटीचे कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथील विद्यार्थी, कर्मचारी, एन.सी.सी. व एन.एस.एस. गटाचे स्वयंसेवक, समतादूत आणि सर्व तालुका समन्वयक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
