Municipal Elections Victory Violence Nashik Chhatrapati Sambhaji Nagar Dhule | राज्यात मतमोजणीला गालबोट: नाशकात दोन गटांत हाणामारी, संभाजीनगरमध्ये दगडफेक; धुळ्यात विजयी मिरवणुकीवर हल्ला – Maharashtra News



राज्यातील 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीने विरोधकांचा धुव्वा उडवत दणदणीत यश संपादन केले आहे. एकूण जागांपैकी सुमारे 213 जागांवर महायुतीचे नगराध्यक्ष निवडून आले असून, महाविकास आघाडीला 51 जागांवर समाधान मानावे लागले आहे. मात्र, विजय

.

राज्यातील निकालांचे अधिकृत आकडे समोर आले असून पक्षनिहाय आकडेवारीनुसार, भाजपने सर्वाधिक 118 जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 58 जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 37 जागांवर दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाचे 31 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसला असून, दोन्ही पक्षांना केवळ 10 नगराध्यक्षपदांच्या जागा जिंकता आल्या.

नाशिकमध्ये दोन गटांत हाणामारी

विजयाचा जल्लोष सुरू असतानाच नाशिकच्या येवला नगरपालिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रभाग क्रमांक चारच्या निकालानंतर शहरातील मोमीनपुरा भागात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव जिव्हारी लागल्याने हा वाद उफाळल्याचे समजते. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या राड्यामध्ये एक महिला आणि तीन पुरुष गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर येवला शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

संभाजीनगरमध्ये पराभूत उमेदवारांकडून दगडफेक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्येही निकालाचा राग दगडफेकीतून बाहेर पडला. येथे चक्क दोन पराभूत उमेदवारांचे गट एकमेकांशी भिडले. आपल्या पराभवासाठी एकमेकांना जबाबदार धरत पैठणच्या नेहरू चौकात दोन्ही गटांकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. या हिंसक वळण घेतलेल्या वादात पाच जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी शहरात अद्याप तणावाचे वातावरण आहे.

धुळ्यात विजयी मिरवणुकीवर हल्ला

धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातही मतमोजणीला गालबोट लागले. शिरपूरमधील वाल्मिक नगर भागात विजयी उमेदवाराची मिरवणूक काढली जात असताना अज्ञातांनी अचानक दगडफेक केली. या प्रकारामुळे मिरवणुकीत सहभागी कार्यकर्त्यांची पळापळ झाली. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *