Mumbai Scholarship Rights Debate; Ramdas Athawale Slams Ajit Pawar Statement | शिष्यवृत्ती कुणाची कृपा, दान किंवा भीक नाही: वंचित, कष्टकरी अन् गुणवंत विद्यार्थ्यांचा घटनात्मक अधिकार, आठवले दादांवर संतापले – Maharashtra News



उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीआरटीआय, बार्टी, सारथीतर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीवर मर्यादा घालण्याच्या विधानाचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खरपूस समाचार घेतला आहे. शिष्यवृत्ती कुणाची कृपा, दान किंवा भीक नाही. ती वंचित, कष्टकरी व गुणवंत

.

अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात विधानसभेत बोलताना काही कुटुंबातील 4-5 जण दरमहा प्रत्येकी 42 हजार रुपयांची फेलोशिप घेतल्याचा दावा करत पीएचडी प्रवेशावर मर्यादा घालण्याचे विधान केले होते. त्यावरून आता राज्याच्या राजकारणात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी अजित पवारांच्या विधानावर आश्चर्य व्यक्त करत त्यांच्यावर उपरोक्त शब्दांत टीका केली आहे.

शिक्षण प्रत्येक माणसाचा मुलभूत अधिकार

रामदास आठवले म्हणाले, अजित पवार हे माझे मित्र आहेत आणि ते फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांशी निष्ठावान नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी केलेले हे वक्तव्य आश्चर्यकारक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात स्पष्टपणे लिहून ठेवले आहे की शिक्षण हा प्रत्येक माणसाचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही; ती वंचित, कष्टकरी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा घटनात्मक अधिकार आहे.

जर एकाच कुटुंबातील पाच विद्यार्थी पीएचडीपर्यंत पोहोचत असतील, तर त्यावर शंका घेण्याऐवजी समाजाने आणि शासनाने अभिमान व्यक्त केला पाहिजे. ही परिस्थिती म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रत्यक्षात उतरलेला विजय आहे. आत्मसन्मान, समता आणि संविधानाने दिलेला हक्क जपण्यासाठी आहे.

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर हात टाकू नका

आठवले पुढे म्हणाले, कोणतेही शिक्षण कमी–जास्त नसते. प्रत्येक विषय, प्रत्येक अभ्यासक्रम आणि प्रत्येक ज्ञानशाखा समाजासाठी तितकीच महत्त्वाची असते. कोणता अभ्यास ‘उपयुक्त’ आणि कोणता ‘अनावश्यक’ हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही. आज वंचित समाजातील विद्यार्थी पीएचडी, संशोधन आणि परदेशी शिक्षणापर्यंत पोहोचत आहेत हेच खरे सामाजिक परिवर्तनाचे जिवंत उदाहरण आहे. गैरप्रकार असतील तर कारवाई करा; पण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर हात टाकू नका! विद्यार्थ्यांशी चर्चा न करता घेतलेला कोणताही निर्णय आम्ही मान्य करणार नाही, असेही आठवले या प्रकरणी म्हणाले.

आत्ता पाहू काय म्हणाले होते अजित पवार?

अजित पवार विधानसभेत बोलताना म्हणाले होते, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल-वंचित घटकांतील, परदेशात शिक्षण घेण्याची क्षमता नसलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्राधान्याने मदत करण्याचा सरकारचा उद्देश आहे. त्यानुसार, सरकारतर्फे टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यासारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. पण काही ठिकाणी एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगाने माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू आहे. सध्या या शिष्यवृत्तीसाठी या संस्थांचा निम्म्यापेक्षा अधिक निधी खर्च होत आहे. त्यामुळे इतर गरजू विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांसाठी निधी उपलब्धतेवर परिणाम होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *