पुणेकरांची ट्रॅफिकमधून होणार सुटका! पाहा काय आहे महाप्लॅन?
Pune Traffic News | पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित यंत्रणा उभारण्याची तयारी सुरू असून शहरभर शेकडो स्मार्ट कॅमेरे बसवले जाणार आहेत. यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्वयंचलित कारवाई होणार असून वाहतुकीला अधिक शिस्त लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुणे (Pune) शहरातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तंत्रज्ञान, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि नागरिकांचा सहभाग या तीन महत्त्वाच्या घटकांवर आधारित धोरण स्वीकारले आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील (Manoj Patil) यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शहरात लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आधारित सुमारे 500 कॅमेरे बसवले जाणार आहेत. तसेच मुंबई (Mumbai) शहराच्या धर्तीवर आधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणाली सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस (Pune City District Congress) पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी (Deepti Choudhary) यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे ट्रॅफिक परिषदेत’ ही माहिती देण्यात आली.
Pune Traffic News | आयटीएमएस, मेट्रो आणि बस डेवर भर
मनोज पाटील यांनी सांगितले की, वाहतूक कोंडी हा आता केवळ रस्त्यांपुरता मर्यादित विषय राहिलेला नाही. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर आणि मानसिक तणावावरही होत आहे. त्यामुळे ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (Intelligent Traffic Management System) अर्थात आयटीएमएस (ITMS) प्रकल्प तयार करण्यात आला असून त्याचा अहवाल मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या प्रणालीअंतर्गत एआय कॅमेरे मानवी हस्तक्षेपाशिवाय वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर थेट दंडात्मक कारवाई करतील.
याशिवाय आगामी काळात शहरात सुमारे 100 किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे उभे राहणार असल्यामुळे वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. मेट्रो स्थानकांजवळ दुचाकी वाहनतळ उभारण्यासाठी महापालिकेशी चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिहीर कुलकर्णी यांनी दिली. तसेच सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी शहरात पुन्हा ‘बस डे’ उपक्रम राबवण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ब्राझील (Brazil) मधील बीआरटी (BRT) मॉडेलचा संदर्भ देत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे मत ॲलिस पोरे यांनी व्यक्त केले.
