तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये!:राज्यभर अन्न व औषध प्रशासनाची छापेमारी, 32 जणांना अटक; मिसलिडिंग जाहिरातींवरही कारवाईचा इशारा
![]()
अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रशासनाने अवघ्या दोन दिवसांत तब्बल 40 ठिकाणी छापे टाकले असून, यात 32 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईत एकूण 24 गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे 12.16 लाख रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या धडक आणि वेगवान कारवाईमुळे अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुन्हेगारांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी यापुढील काळात कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे, 25 मे रोजी तुकाराम मुंढे यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्या 21 वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकिर्दीतील ही तब्बल 25 वी बदली असून, पदभार स्वीकारताच त्यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक आणि शिस्तबद्ध कार्यशैलीची चुणूक पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. 19 लाख रुपयांहून अधिक किमतीचा अवैध साठा जप्त पुणे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त आणि बेकायदेशीर अन्नपदार्थ विक्रेत्यांविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे. आंबेगाव आणि खेड तालुक्यातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून प्रशासनाने गुटखा, पानमसाला, अप्रमाणित सुपारी आणि इतर संशयित अन्नपदार्थांचा तब्बल 19 लाख रुपयांहून अधिक किमतीचा अवैध साठा जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान काही आस्थापना कोणताही परवाना नसताना बेकायदेशीरपणे व्यवसाय करत असल्याचेही उघडकीस आले असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा अपप्रवृत्तींविरोधात यापुढेही कडक मोहीम सुरूच राहील, असा सज्जड इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. मिसलिडिंग जाहिरातींवरही कारवाईचा इशारा बड्या ब्रँड्सची आश्वासने आणि मिसलिडिंग जाहिरातींना भुलून ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आता आक्रमक झाले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांना कडक कारवाईचा इशारा दिला असून, अशा जाहिरातींमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींवरही यापुढे कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ग्राहक संरक्षणासाठी प्रशासनाने घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे तुकाराम मुंढे पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या आक्रमक कार्यशैलीत सक्रिय झाल्याचे दिसून येत असून, सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांच्या या तत्परतेचे आणि धडक निर्णयांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. 25 मे रोजी तुकाराम मुंढेंनी पदभार स्वीकारला गेल्या काही काळापासून लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सातत्याने वादग्रस्त ठरलेल्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आता तुकाराम मुंढे यांची बदली केली आहे. या बदलीचे अधिकृत आदेश शासनाकडून जारी झाल्यानंतर, मुंढे यांनी 25 मे रोजी या नव्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला असून, भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेल्या या विभागाची सूत्रे आता त्यांच्या हाती आल्याने प्रशासकीय कामकाजात मोठी सुधारणा होण्याची आणि शिस्त येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
