भाजपची गाडी 'फुल', अजित पवार-शिंदेंना डच्चू देण्याची तयारी:उद्या एकनाथ शिंदेंचे आमदारही भाजपमध्ये जातील, ठाकरे गटाचा दावा

0
08-2024-10-27t0712344741729993394_1777690821.jpg




ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून आमदार बच्चू कडू यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेवर प्रहार करतानाच महायुतीतील भविष्यातील मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बच्चू कडू यांनी आमदारकीसाठी घेतलेली जिवंत समाधी म्हणजे केवळ सत्तेसाठी रचलेले ‘मंबाजीचे ढोंग’ असून, घसरलेल्या राजकीय पातळीचे हे विदारक चित्र असल्याची टीका ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून केली आहे. तर सत्तेच्या वैकुंठप्राप्तीसाठी तत्त्वांना तिलांजली देत कडू आता शिंदेवासी झाले असले, तरी सामान्य शेतकरी, दिव्यांग आणि विधवा मात्र आजही न्यायाच्या प्रतीक्षेत तिथेच आहेत, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. ठाकरे गटाने म्हटलंय की, भाजप आता स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. भाजपची गाडी आता पूर्ण भरली असून, ही गाडी लवकरच अजित पवारांचा पक्ष आणि शिंदे गटाला ठोकर मारून पुढे जाईल, असा दावा करण्यात आला आहे. भविष्यात शिंदे गटाचे आमदार भाजपमध्ये विलीन होतील आणि एकनाथ शिंदे रिकामे होतील, तेव्हा बच्चू कडूंसारखे लोक पुन्हा भाजपचा भंडारा उधळत त्यांच्या गाडीला लटकण्याचा प्रयत्न करतील. सत्तेच्या हव्यासापोटी सुरू असलेला हा खेळ म्हणजे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला लागलेली कळीमा आहे. ठाकरे गटाने काय म्हटले वाचा जशाच्या तसे ठाकरे गटाच्या मुखपत्रातून म्हटले आहे की, अमरावती विभागात बराच काळ आमदार व मंत्री असलेले श्रीमान बच्चू कडू यांनी स्वतःला शिंदे गटात विलीन करून जिवंत समाधी घेतली. या समाधी सोहळ्यास स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे व कडू यांचे अनुयायी हजर होते. कडू यांचा हा समाधी व समर्पणाचा सोहळा आटपल्यावर त्यांचा राजकीय वैकुंठाचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी त्यांचे नवे गुरू महाराज शिंदे यांनी कडू महाराजांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यामुळे समाधी अवस्थेत कडू यांना देव दिसला. कडू हे विधानसभा निवडणूक हरले तेव्हापासून ते पाण्याबाहेर पडलेल्या माशाप्रमाणे तडफडताना दिसत होते. एका सामाजिक कार्यकर्त्याची ही तडफड समाजाला अस्वस्थ करणारी आहे. कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोर्चे काढले, आंदोलने केली. दिव्यांगांच्या, वंचितांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवला. त्यांच्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते महाराष्ट्रात काम करीत होते. ..मग कडूंकडून सरकारवर टीका ठाकरे गटाने म्हटलंय की, उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते, पण शिंदे गट फुटला व सरकार पडले तेव्हा हा ‘सेवाभावी’ कार्यकर्ता सुरत, गुवाहाटी, गोवा अशी तीर्थयात्रा करून महाराष्ट्रात परतला व गंगेत डुबकी मारून आल्याचा आनंद घेत सरकारदरबारी फिरत राहिला. त्यामुळे लोकांना त्यांचे खरे रूप दिसले. कडू हे समाजसेवेचा बुरखा पांघरून राजकारण करणारे व स्वार्थ साधणारे व्यक्तिमत्त्व आहे. अशा लोकांचा भरणा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वाढला आहे. कडू हे त्यांचे मार्गदर्शक, आदर्श म्हणून पुढे आले. आपण मूळचे शिवसैनिक असल्याचे ते सांगतात, पण शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून मोठ्या सेवाभावी वृत्तीने त्यांनी तेव्हा शिवसेना व हिंदुत्व सोडले. ते निधर्मी झाले. लोकांनी त्यांना बिनपक्षाचे उमेदवार म्हणून निवडून दिले. त्यानंतर ते फडणवीस, मोदी यांच्या भूमिकेवर टीका करीत राहिले व महाविकास आघाडीत मंत्रीपदाची शिदोरी मिळवली. कोविड काळानंतर सत्ताबदलाची चाहूल लागताच अपंग, शेतमजुरांच्या कल्याणासाठी त्यांनी शिंदे यांची भलामण सुरू केली. ही भलामण करूनही मंत्रीपद मिळाले नाही तेव्हा पुन्हा सरकारवर टीका सुरू केली. उपोषणे, आंदोलने सुरू केली. लाचारीची कोणती पायरी समजायची? ठाकरे गटाने म्हटलंय की, कडू महाराज 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हरले. त्यांची आमदारकीची वस्त्रे जनतेने उतरवली तेव्हापासून त्यांची तडफड सुरू होती. आता या तडफडणाऱ्या आत्म्याने शरीरावर नवीन वस्त्रे परिधान करून शिंदे पक्षात प्रवेश केला व पुन्हा ‘आमदार’ म्हणून प्राणज्योतीचा दिवा पेटवला.‘आमदारकी’साठी कडू महाराजांनी घेतलेली ही समाधी म्हणजे समाजकारणाच्या नावाखाली सुरू असलेल्या ढोंगाचा पर्दाफाश आहे. यापुढे कडू महाराज हे शिंदे यांची ताकद वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहेत. मात्र त्याआधी त्यांचे विधान होते की, ‘‘आम्ही शिंदेंसोबत आमदारकीसाठी जाणार नाही. आमदारकीसाठी शिंदेंसोबत जाण्याएवढे आम्ही नालायक नाही.’’ कडू महाराजांनी हे दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते. आज त्याचा त्यांना विसर पडला आणि ते ‘शिंदे वासी’ झाले. अमरावतीत ‘बच्चू कडू विरुद्ध रवी राणा’ असा संघर्ष आहे. दोन ‘नौटंकी’मधला हा संघर्ष म्हणजे जनतेला मूर्ख बनविण्याचे धंदे आहेत. राणा यांना भाजपने उमेदवारी दिली तेव्हा ही ‘लाचारी’ असल्याची टीका कडू यांनी केली. मग आता कडू महाराजांनी जी समाधी घेतली ती लाचारीची कोणती पायरी समजायची? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांनी मंत्री गुलाबराव पाटलांच्या घरावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. यावर ‘‘हिंमत असेल तर मोर्चा काढून दाखवा’’ अशी आव्हानाची भाषा मंत्री गुलाबराव पाटलांनी केली. पुढे हा मोर्चा काही निघाला नाही व आता खुद्द कडू महाराजच शिंदेंच्या गुलाब सेनेत विलीन झाले. दिव्यांग, शेतकरी, विधवा आहे तिथेच ठाकरे गटाने म्हटलंय की, महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाचे हे विचित्र स्वरूप आहे. आमदारकी नसेल तर काम करता येत नाही, कार्यकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करता येत नाहीत असे कडूंचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या, दिव्यांगांच्या, विधवांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे आपण शिंदे यांच्याशी हातमिळवणी केली असे खुलासे कडू महाराज करीत आहेत, पण त्यांची पुरती बेअब्रू समाधी प्रकरणात झाली. भाजप भविष्यातील निवडणुका ‘स्वबळावर’ लढणार आहे. भाजपची गाडी फुल झाली, चढायला जागा नाही. ही गाडी अजित पवारांचा पक्ष व शिंदेंच्या पक्षाला ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारात आहे. अजित पवारांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे व उद्या शिंदेंचे आमदारही भाजपमध्ये जातील. शिंदे रिकामे होतील तेव्हा आताची समाधी अवस्था सोडून कडू महाराजांसारखे लोक भाजपचा भंडारा उधळतील. फडणवीस, मोदींचा जय करीत दिव्यांगांच्या न्यायासाठी भाजपच्या गाडीस लटकण्याचा प्रयत्न करतील. कडू महाराजांची समाधी म्हणजे मंबाजीचे ढोंग आहे, घसरलेल्या राजकीय पातळीचे चित्र आहे. विधान परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज राजकीय वैकुंठप्राप्तीस निघाले आहेत. दिव्यांग, शेतकरी, विधवा मात्र जेथे होत्या तेथेच आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed