'मिसिंग लिंक'ची एक मार्गिका बंदच:मुंबई ते पुणे मार्गिका सुरू, पण पुणे ते मुंबई मार्गिका अद्याप बंद; काम सुरू असल्याची माहिती

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-01t12_1777693682.png




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे उद्घाटन केले. त्यानंतर हा मार्ग लगेचच वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता होती. पण या मिसिंग लिंकवरील एक मार्गिका अर्धवट कामांमुळे अद्याप बंद असल्याचे आज समोर आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील 2-3 दिवसांत ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली होईल, असे सांगण्यात येत आहे. मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागात मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्यात आला आहे. या मिसिंग लिंकमुळे या एक्सप्रेस वेवरील घाटातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक वेगवान व सुरक्षित होणार असल्याचा दावा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी आजपासूनच हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्याची घोषणा केली. पण प्रत्यक्षात या मिसिंग लिंकच्या दोन पैकी एक मार्गिकाच वाहतुकीसाठी खुली झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. पुणे – मुंबई मार्गिका बंद यासंबंधीच्या माहितीनुसार, लोणावळा घाटातील मिसिंग लिंक शुक्रवारी सुरू झाली. त्यानुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहने या मिसिंग लिंकवरून सुसाट वेगाने धावत आहेत. पण पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी मार्गिका अद्याप बंद आहे. यामुळे पुणे ते मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना अद्याप जुन्या मार्गानेच प्रवास करावा लागत आहे. पुण्याहून मुंईला येणाऱ्या मिसिंग लिंकच्या मार्गिकेवरील काम अद्याप बाकी आहे. हे काम पुढील 2-3 दिवसांत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर या मार्गिकेवरील वाहतूक सुरू होईल अशी माहिती प्रशासनाकडून या प्रकरणी दिली जात आहे. आज वाहतूक कोंडी नाही मुंबई – पुणे महामार्गावर शुक्रवारी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे विकेंड साजरा करण्यासाठी निघालेल्या शेकडो प्रवाशांना त्याचा फटका बसला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही या कोंडीचा फटका बसला. त्या जवळपास 2 तास या वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. त्यांनी या घटनेचा एक व्हिडिओ शेअर करून आपली व्यथा बोलून दाखवली होती. त्याची दखल स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. पण आज या मार्गावरील वाहतूक सुरुळीतपणे सुरू आहे. मिसिंग लिंकची एक मार्गिका सुरू झाल्यामुळे ट्रॅफिक जामचा प्रश्न काहीअंशी सुटल्याचे चित्र आहे. कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प? द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट दरम्यानचा रस्ता सध्या सहा पदरी आहे. या ठिकाणी द्रुतगती मार्गाच्या 6 पदरी मार्गासोबत राज्य मार्गाच्या चार पदरी मार्गाची वाहतूक एकत्र येऊन एकूण 10 पदरी वाहतूक निर्माण होते. घाट विभाग असल्याने येथे चढ-उतार जास्त असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे मुंबईकडे जाणारी डोंगरालगतची एक लेन अनेकदा बंद ठेवावी लागते. या अडचणी दूर करण्यासाठी आणि अधिक सक्षित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला. या अंतर्गत खालापूर ते खोपोली इंटरपैज दरम्यानच्या 5.86 किमी लांबीच्या 6 पदरी रस्त्याचे 8 पटरीकरण करण्यात आले आहे. तसेच खोपोली एक्झिट ते कुसगाव सिंहगड इन्स्टिट्यूट या 12.30 किमी लांबीच्या उर्वरित भागासाठी दोन बोगदे आणि दोन व्हायाडक्ट उभारण्यात आले आहेत. 5.88 किमीच्या 8 पदरी स्टीकरणासह एकूण 19.16 कि. मी. लांबीचा हा अत्याधुनिक मार्ग विकसित करण्यात आला आहे. 29 ऑगस्ट 2018 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या प्रकल्पासाठी रु. 6895, 36 कोटीच्या भांडवली खर्चास तसेच स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती जगातील सर्वाधिक रुंद बोगद्‌यांची निर्मिती या प्रकल्पातील दोन बोगद्‌यांची उभारणी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड तंत्रज्ञाना‌द्वारे करण्यात आली आहे. प्रत्येकी 23.50 मीटर रुंदीचे हे बोगदे सहयादी पर्वतरांगांमध्ये खोदणे हे मोठे अभियांत्रिकी आव्हान होते. जगातील सर्वाधिक रुंदीचे बोगदे म्हणून यांची गिनीज बुकमध्ये होण्याकरिता प्रक्रिया सुरु आहे बोग‌द्यांमधील विविध प्रकारच्या खडकांचे भूगर्भशास्त्रीय परीक्षण करून आवश्यक ती दक्षता घेण्यात आली. बोगदा क्रमांक 1 ची लांबी 58 कि. मी. असून बोगदा क्रमांक 2 ची लांबी 8.86 कि. मी. आहे. विशेष म्हणजे, दुसरा बोगदा लोणावळा तलावाच्या पातळीपासून सुमारे 180 मीटर खाली आहे. त्यामुळे ब्लास्टिंगसारख्या कामांमध्ये मोठे तांत्रिक आव्हान होते; मात्र एमएसआरडीसीने ते यशस्वीरित्या पूर्ण केले. टायगर व्हॅलीतील केबल-स्टेड ब्रिज अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना या दोन बोग‌द्यांना जोडणारा टायगर व्हॅलीतील 650 मीटर लांबीचा केबल-स्टेड ब्रिज हा या प्रकल्पाचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. सुमारे 125 मीटर उंचीवर उभारण्यात आलेला हा पूल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना आहे. 182 मीटर उंचीचे दोन पायलॉन (स्तंभ) आणि एकूण 240 केबल्सच्या सहाय्याने हा पूल उभारण्यात आला आहे. या पुलासाठी विंड टनेल टेस्ट’, ‘फॅटिंग व टेन्साइल टेस्ट’ तसेच ‘स्टे केबल टेस्टा अशा अत्याधुनिक चाचण्या विदेशात करण्यात आल्या आहेत. डोंगर-दऱ्यांनी वेढलेल्या या परिसरात महाकाय यंत्रसामग्री पोहोचविणे, तसेच वेगवान वारे आणि मुसळधार पावसात काम करणे ही मोठी आव्हाने होती. कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीतही सर्व सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे पाळत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. या नव्या मार्गामुळे घाटातील अवघड वळणे आणि अपघातप्रवण क्षेत्र टाळता येणार असून प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. तसेच, वाहनांच्या इंधनाच्या वापरात घट होऊन दररोज अंदाजे 1 कोटी रुपयांची बचत होणार आहे. परिणामी, प्रदूषणातही लक्षणीय घट होण्यास मदत होणार आहे. राज्यातील पुढील विकासासाठी तसेच पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा या भागांच्या प्रगतीसाठी मिसिंग लिंक प्रकल्प भविष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed