महाराष्ट्र पोलिस दलात बदल्यांचा धडाका:अनेक जिल्ह्यांना मिळाले नवीन पोलिस अधीक्षक, 1 मेच्या पूर्वसंध्येला गृह विभागाचा निर्णय

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-30t204516385_1777562149.jpg




महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या गृह विभागाने पोलिस दलात मोठे फेरबदल केले असून, अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या शासन निर्णयानुसार जालना, अमरावती ग्रामीण, नाशिक ग्रामीण, अहिल्यानगर, परभणी, नंदूरबार, चंद्रपूर, ठाणे ग्रामीण आणि वाशिम या जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे. तसेच ‘फोर्स वन’चे पोलिस अधीक्षक गजानन राजमाने यांच्यासह राज्य गुप्तवार्ता विभाग, नागरी हक्क संरक्षण आणि इतर विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही स्थानांतर करण्यात आले असून, प्रशासकीय निकडीनुसार गृह विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. सध्या जालना येथे अपर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले नोपानी आता जिल्ह्याचे नेतृत्व करतील. विशेष म्हणजे, त्यांनी यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातच वरोरा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून आपली सेवा बजावली असल्याने त्यांना या जिल्ह्याच्या भौगोलिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचा चांगला अनुभव आहे. दरम्यान, चंद्रपूरचे विद्यमान पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगर (अहमदनगर) येथे पोलिस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या नेतृत्वातही महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, डॉ. डी. एस. स्वामी यांची नवीन पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीणचे मावळते अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची मुंबई पोलिस उपायुक्त (DCP) पदावर बदली करण्यात आली असून, त्यांच्याकडे आता राज्याच्या राजधानीतील महत्त्वाची जबाबदारी असेल. डॉ. स्वामी यांच्या अनुभवाचा नाशिक ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा उपयोग होणार आहे. वाशिम जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक नियुक्तीबाबत मात्र प्रशासकीय स्तरावर मोठी घडामोडी पाहायला मिळाली. नितेश खाटमोडे हे आता वाशिमचे नवीन पोलिस अधीक्षक असतील. विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वी 16 एप्रिल रोजी राजेंद्र शिंदे यांची या पदावर नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता ऐनवेळी शिंदे यांच्याऐवजी खाटमोडे यांचे नाव समोर आल्याने पोलिस वर्तुळात आणि जिल्ह्यात हा चर्चेचा मोठा विषय ठरला आहे. धुळे जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक पदी विशाल आनंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून हे पद रिक्त असल्याने जिल्ह्याला नवीन पोलिस प्रमुख कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विशाल आनंद हे यापूर्वी अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. आता त्यांच्या नियुक्तीमुळे धुळे जिल्ह्याच्या पोलिस प्रशासनाला पूर्णवेळ वरिष्ठ अधिकारी मिळाला आहे. परभणी जिल्ह्याच्या पोलिस दलातही महत्त्वाचे फेरबदल झाले असून, पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांची मुंबई येथे राज्य गुप्तवार्ता विभागात (SID) उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता पंकज कुमावत परभणीचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारतील. कुमावत हे सध्या अमरावती येथे अपर पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत असून, त्यांच्या अनुभवाचा परभणी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपयोग होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed