इच्छामरणाचा सल्ला नाकारला:पुण्यातील डॉक्टरांनी 85 टक्के किडनी निकामी 'शेल्बी'ला दिले जीवदान
![]()
८५ टक्के किडनी निकामी झाल्याने इच्छामरणाचा सल्ला दिलेल्या ‘शेल्बी’ नावाच्या ५ वर्षांच्या जर्मन शेफर्डला पुण्यातील डॉक्टरांनी डायलिसिसच्या मदतीने नवे आयुष्य दिले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात, याचा प्रत्यय या घटनेतून आला आहे. बेळगावी येथील डोड्डनवर कुटुंबाचा सदस्य असलेला शेल्बी काही दिवसांपासून अशक्त आणि शांत दिसत होता. त्याला उलट्या होणे, खाणे-पिणे बंद होणे आणि भूक मंदावणे अशी लक्षणे होती. १५ मार्चपासून बंगळुरूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, १५ दिवस रुग्णालयात राहूनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने आणि दोन्ही मूत्रपिंडे गंभीररीत्या निकामी झाल्याने, ३१ मार्च रोजी डॉक्टरांनी त्याला वेदनामुक्त करण्यासाठी इच्छामरणाची शिफारस केली होती. शेल्बीच्या कुटुंबाने हार न मानता १ एप्रिल २०२४ रोजी त्याला पुण्यातील ‘द स्मॉल अॅनिमल क्लिनिक’ येथे डॉ. नरेंद्र परदेशी यांच्याकडे दाखल केले. तपासणीअंती त्याचे क्रिएटिनिन ६.०६ एमजी/डीएल इतक्या धोकादायक पातळीवर असल्याचे आढळले. ‘टिक फीव्हर’मुळे त्याच्या दोन्ही किडन्या ८५ टक्के बाधित झाल्याचे निदान झाले. डॉ. नरेंद्र परदेशी यांनी तातडीने शेल्बीवर ‘हेमोडायलिसिस’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. १ एप्रिलपासून त्याचे डायलिसिसचे सत्र सुरू झाले. रक्तातील विषारी घटक बाहेर काढल्यामुळे शेल्बीच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा दिसू लागली. ७ एप्रिल रोजी तिसऱ्या डायलिसिसनंतर क्रिएटिनिन ४.८५ एमजी/डीएलवर आले, तर १७ एप्रिलपर्यंत ते ३.५२ एमजी/डीएल पर्यंत खाली आले. सोनोग्राफीतून किडन्यांमधील रक्तप्रवाह सुधारल्याचे स्पष्ट झाले. क्लिनिकमधील कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या विशेष काळजीमुळे त्याची प्रकृती वेगाने सुधारली. सध्या शेल्बीची प्रकृती स्थिर असून त्याचे इंजेक्शन आणि आयव्ही फ्लुइड्स बंद करण्यात आले आहेत. तो आता स्वतःहून विशेष ‘रेनल डाएट’ घेत आहे. पुढील आठवड्यात शेल्बीला डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात येणार आहे. डॉ. नरेंद्र परदेशी यांनी सांगितले की, वेळेत उपचार मिळाल्यास प्राण्यांमध्येही किडनीचे गंभीर आजार बरे होऊ शकतात. शेल्बीने उपचारांना दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. शेल्बीच्या मालकांनी डॉक्टरांचे आभार मानताना सांगितले की, शेल्बी त्यांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे आणि तो पुन्हा सक्रिय झालेला पाहून त्यांना चमत्काराचा अनुभव येत आहे.
