हिंगोलीत वनविभागाचे दोन ठिकाणी छापे:दोन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
![]()
औंढा नागनाथ तालुक्यात वन विभागाचे पथकाने दोन ठिकाणी शुक्रवारी तारीख 29 टाकलेल्या छाप्यामध्ये दोन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभाग अंतर्गत औंढा वनपरिक्षेत्रातील मौजे जवळा बाजार येथील एका पेट्रोल पंपाजवळ आमराई मध्ये सागवान व इतर अधिसूचित वृक्ष प्रजातीचे वृक्ष तोड करुन लाकडांचा साठा केला असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी डॉक्टर राजेंद्र नाळे, सहाय्यक वन संरक्षक सचिन माने यांना मिळाली होती. त्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल स्वाती कीर्तनकार, वनरक्षक सुधाकर चोपडे व वनरक्षक गंगाधर शिंदे, वाहन चालक भूतनर यांचेसह इतर कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी संशयित इसम करीमोद्दीन खमरोद्दीन खतीम रा. औंढा ना. यांचे विरुध्द भारतीय वन अधिनियम चे कलम ४१,४२ व ५२ अन्वये वन गुन्हा क्र. ०४/२०२६ नोंदविण्यात आला आहे. सदरच्या वन गुन्ह्यात एकूण २०२ नग लाकूड जप्त केले असून त्याचे परिमाण १२.०८ घन मीटर आहे. त्याची एकूण किंमत रुपये १.९३.९१७ एवढी आहे. तसेच संशयित खान दौलत खान आब्बास रा. जवळा बाजार यांनी सागवान व गैरी प्रजातीचे लाकडे अवैधरित्या तोडुन वाहतुक करून साठवणूक केल्यामुळे भारतीय वन अधिनियम चे कलम ४१,४२ व ५२ वनगुन्हा क्र. ०२/२०२६ नोंदविण्यात आला आहे. सदरच वन गुन्ह्यात एकूण १२३ नाग लाकूड जप्त केले असून त्याचे परिमाण ५.८४५ घन मीटर आहे. त्याची एकूण किंमत रुपये १४.११७ एवढी आहे. दोन्ही वन गुन्ह्यात एकुण तोड व वाहतूक परवानगी आवश्यक असलेल्या प्रजातीचा एकूण १७.९२८ घ.मी. गोल माल जप्त करण्यात आला आहे. जप्त मालाची एकूण किंमत रु.२,०८,०२५/- इतकी आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून वन विभागा कडून पुढील कारवाई केली जात आहे. हिंगोली जिल्ह्यात वृक्षतोड, वन वनवा, वन्यप्राणी शिकार निदर्शनास आल्यास वन विभागाच्या ‘१९२६’ या हेल्प लाईन वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
