अंदाज समितीने अधिकाऱ्यांना फटकारले:कोणार्क, पोषण आहार, कंपोस्ट डेपो आगीच्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितले

0
b621b786-8332-4500-a381-65cc3fa3f401_1777565948978.jpg




विधीमंडळ अंदाज समितीने गुरुवारी जिल्हा प्रशासनातील विभागप्रमुखांची पुन्हा एकदा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात झालेल्या या बैठकीत शहरातील कचरा विल्हेवाट लावणारी कोणार्क कंपनी, शालेय पोषण आहार आणि सुकळी येथील कंपोस्ट डेपोला वारंवार लागणाऱ्या आगीचे मुद्दे केंद्रस्थानी होते. आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत एकूण २९ सदस्य आहेत. अमरावतीत ११ प्रतिनिधी दाखल झाले होते, त्यापैकी १० सदस्य आजच्या बैठकीला उपस्थित होते. समितीने गेल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात केलेल्या पाहणीचा अहवाल लवकरच विधीमंडळाला सादर केला जाणार आहे. समितीच्या सदस्यांनी दुसऱ्या दिवशी चार गटांमध्ये विभागणी करून जिल्ह्यातील अनेक विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीत आढळून आलेल्या त्रुटींवरून त्यांनी आजच्या बैठकीत अधिकाऱ्यांना जाब विचारला. कोणार्क कंपनीला कचरा विल्हेवाटीचे कंत्राट देताना २०२५ नंतरची नवीन वाहने पुरवण्याची अट होती. मात्र, प्रत्यक्ष करारनाम्यात २०२३ सालची वाहने स्वीकारण्यात आल्याचे समितीच्या निदर्शनास आले. या मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी आयुक्त वर्षा लढ्ढा अनुपस्थित होत्या, तर अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक समाधानकारक माहिती देऊ शकल्या नाहीत. जिल्हा परिषदेच्या संदर्भात, समितीने पोषण आहाराच्या मुद्द्यावर लक्ष वेधले. काही दिवसांपूर्वी पोषण आहारामुळे शालेय विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली होती. अशा चुका पुन्हा होऊ नयेत, याची काळजी घेण्याचे निर्देश समितीने दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *