शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातच:उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पुणे बाल पुस्तक जत्रेत घोषणा

0
02a9a4eb-c153-49f4-a654-438c7ac6e87e_1777559560655.jpg




पुण्यात शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पुणे बाल पुस्तक जत्रेच्या उद्घाटनप्रसंगी गुरुवारी त्यांनी ही माहिती दिली. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी हे संमेलन उपयुक्त ठरेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. या संमेलनाबाबत कोणतीही शंका बाळगू नये, असे आवाहन पाटील यांनी केले. लहान मुलांना आणि युवकांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी उत्तम पुस्तके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडावी, असेही ते म्हणाले. पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका, समर्थ युवा फाऊंडेशन आणि संवाद पुणे यांच्या वतीने आयोजित पुणे बाल पुस्तक जत्रेचे उद्घाटन उत्साहात झाले. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ही जत्रा ४ मेपर्यंत विनामूल्य सुरू आहे. यावेळी उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत (दूरदृष्य प्रणालीद्वारे), महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, आमदार हेमंत रासने, पुणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश निकम, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक श्यामकांत देवरे, बालसाहित्यिक राजीव तांबे, अरूण गीते, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आणि संवाद पुणेचे सुनील महाजन आदी उपस्थित होते. तरुण आणि लहान मुले वाचत नाहीत, असे सरसकट म्हणणे आता योग्य नाही, असे पाटील म्हणाले. गेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला १५ लाख नागरिकांनी भेट दिली होती, ज्यात ५ लाखांपेक्षा अधिक उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि लहान मुले होती, असे त्यांनी नमूद केले. मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्याची जबाबदारी शिक्षक आणि पालकांची आहे. त्यासाठी त्यांना दर्जेदार बालसाहित्य उपलब्ध करून द्यावे लागेल. लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यातून वाचन चळवळ पुढे जावी, या उद्देशानेच गेल्या दोन वर्षांपासून पुणे बाल पुस्तक जत्रेचा अभिनव प्रयोग राज्यात होत आहे. या जत्रेत सर्व पुणेकरांनी कुटुंबासह सहभागी होऊन मराठी भाषा आणि साहित्य-संस्कृती वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले. महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, नवीन पिढी वाचनाशी जोडली जावी, हे थोर महापुरुषांनी पाहिलेले स्वप्न पुणे बाल पुस्तक जत्रेतून साकार होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या विकसित भारताच्या संकल्पनेची ही जत्रा एक पायरी आहे. मुलांनी चांगल्या पुस्तकांना आपला मित्र करावे. शिक्षक आणि पालकांनी मुलांना अधिकाधिक नावीन्यपूर्ण पुस्तके देण्यासाठी प्रयत्न करावेत. या जत्रेत महानगरपालिका उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याचा आनंद आहे, असेही नागपुरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed