Zeeshan Siddique | विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर
Zeeshan Siddique | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) विधान परिषद निवडणुकीसाठी झिशान सिद्दीकी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयाद्वारे आगामी काळात मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा आणि पक्षाची ताकद वाढवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न दिसून येत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर झिशान यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे विशेष आभार मानले.
राजकीय पुनर्वसन आणि राष्ट्रवादीची खेळी
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागल्याने गेल्या दीड वर्षांपासून झिशान सिद्दीकी यांच्याकडे कोणतेही पद नव्हते. विधान परिषदेची उमेदवारी देऊन पक्षाने त्यांचे पुनर्वसन केले आहे. सुनेत्रा पवार यांनी त्यांना “वैयक्तिक दुःख बाजूला सारून जनतेसाठी काम करा,” असा मोलाचा सल्ला दिल्याचे झिशान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वडिलांची हत्या आणि राष्ट्रवादीत प्रवेश
झिशान यांचे वडील आणि ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी ४ दशकांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर २०२४ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, १२ ऑक्टोबर २०२४ रोजी बाबा सिद्दीकी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेनंतर झिशान सिद्दीकी यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘घड्याळ’ हाती बांधले. यापूर्वी २०२४ च्या विधान परिषद निवडणुकीत ‘क्रॉस व्होटिंग’ केल्याच्या आरोपावरून काँग्रेसने त्यांचे निलंबन केले होते.
वांद्रे पूर्व मधील राजकीय इतिहास
२०१९ मध्ये शिवसेनेतील अंतर्गत बंडखोरीचा फायदा घेत झिशान यांनी ५,००० मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यावेळी शिवसेनेने तृप्ती सावंत यांच्याऐवजी विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती, ज्यामुळे मतांचे विभाजन झाले होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘मातोश्री’ असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई यांनी झिशान सिद्दीकी यांचा ११,००० मतांनी पराभव केला होता.
वांद्रे पूर्व आणि मुंबईतील इतर भागांत मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. झिशान सिद्दीकी यांच्या रूपाने एक तरुण आणि आक्रमक मुस्लिम चेहरा विधान परिषदेवर पाठवून, महायुती विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
News Title: Zeeshan Siddique Nomination NCP Candidate Vidhan Parishad Election
