आपली संख्या तुटपुंजी, काही गोष्टी वाटून घ्याव्या लागतील:प्रादेशिक पक्ष मजबूत करणे काँग्रेसचे कर्तव्य, संजय राऊतांचा मित्रपक्षाला सल्ला

0
new-project-2026-04-30t111443416_1777529660.jpg




विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत सुरू असलेल्या ओढाताणीवर संजय राऊत यांनी आज सडेतोड भूमिका मांडली. “आम्ही दिल्लीत काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून लढत आहोत, मोदींचा पराभव करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र, अशा वेळी राज्यांमधील छोट्या जागांवरून काँग्रेसने मित्रपक्षांशी संघर्ष करू नये,” असे सल्ला संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षाला दिला आहे. तसेच, बच्चू कडू यांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाच्या चर्चेवरही त्यांनी उपरोधिक टिप्पणी केली. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी “पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का?” असे विधान केले होते. त्यावर राऊत म्हणाले, “आता कोण मूर्ख आहे, हे येणारा काळच ठरवेल. जर एका विधान परिषदेसाठी तुम्हाला असा निर्णय घ्यावा लागत असेल, तर याचा अर्थ विधानसभेला तुमची निवडून येण्याची क्षमता संपलेली आहे. हेच बच्चू कडू पूर्वी उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, पण आताची त्यांची भूमिका त्यांचा प्रश्न आहे.” प्रत्येक वेळी काँग्रेसच्या मनात काही शंका असतात ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस देखील आपला उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, प्रत्येक वेळी काँग्रेसच्या मनात काही शंका असतात. राज्यसभेच्या वेळेला शरद पवारांच्या नावासंदर्भात त्यांच्या मनात संभ्रम होता. पण शरद पवारांना पाठिंबा देण्याचा पहिला निर्णय काँग्रेसनेच जाहीर केला. ते ठपका आमच्यावर ठेवतात. आपली संख्या तुटपुंजी, काही गोष्टी वाटून घ्याव्या लागतील संजय राऊत म्हणाले, “आता या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निवृत्त झाल्यावर, त्यांच्या जागी शिवसेनेने अंबादास दानवे यांना उमेदवार दिली. मला इतकेच म्हणायचे आहे की, आपली संख्या तुटपुंजी आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीला आपल्याला काही गोष्टी वाटून घ्याव्या लागतील. आता शिवसेनेला आहे. मागणी राज्यसभेची निवडणूक शरद पवारांना गेली. पुढील विधान परिषद ही काँग्रेसने घ्यावे, अशा प्रकारची चर्चा होऊ शकते. काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे.” प्रादेशिक पक्ष मजबूत करणे काँग्रेसचे कर्तव्य संजय राऊत म्हणाले, “मला काँग्रेसच्या नेत्यांनी विचारले आम्हाला काय मिळणार? आम्हाला काही मिळत नाही. काँग्रेसच्या नेतृत्त्वाला आम्हाला वारंवार सांगायचे आहे की, आम्ही दिल्लीत राष्ट्रीय स्तरावर तुमच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. परवाच्या डिलिमिटेशनच्या बिलावेळी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली विरोधी पक्षाचा जो विजय झाला आणि मोदींचा पराभव झाला, त्यामध्ये आमचे नऊ खासदार तुमच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. २०२९ मध्ये आम्हाला संधी प्राप्त झाली, तर आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर काँग्रेसचाच पंतप्रधान होणार आहे. त्यामुळे राज्याराज्यातील प्रादेशिक पक्ष हे अधिक मजबूत करणे आणि काँग्रेसच्या बरोबरीने उभे राहतील असे वातावरण निर्माण करणे हे काँग्रेसच्या नेतृत्त्वाचे कर्तव्य आहे, असे मी मानतो.” काही पदांसाठी मित्र पक्षांशी संघर्ष नको संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तमिळनाडूमध्ये प्रादेशिक पक्षांच्या हक्कांवर तुम्ही डल्ला मारू नका. उद्धव ठाकरेंच्या भाषेत मोठे व्हिजन ठेवा. आम्हाला या देशाच्या नेतृत्त्वात परितर्वन करायचे आहे आणि ते काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली करायचे आहे. काँग्रेसचा पंतप्रधान व्हावा अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे. अशावेळेला एखाद्या राज्यातील विधान परिषद किंवा अन्य काही पदांसाठी आपल्या मित्र पक्षांशी संघर्ष होऊ नये ही आमची आणि शरद पवार गटाची भूमिका आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed