गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा; नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, 25.25 लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 28 एप्रिल 2026 रोजी पहाटे सुमारे 3.50 वाजताच्या सुमारास मौजे गंगाबेट परिसरातील गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने घटनास्थळी धाड टाकली. कारवाईदरम्यान आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये नदीपात्रातून रेती उपसा करण्यासाठी वापरली जाणारी 20 तराफे (प्रत्येकी अंदाजे 50 हजार रुपये किंमत), 5 इंजिन (प्रत्येकी सुमारे 3 लाख रुपये किंमत) आणि सुमारे 65 ब्रास रेती (अंदाजे 25 हजार रुपये किंमत) यांचा समावेश आहे. एकूण जप्त मालाची किंमत 25,25,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 456/2026 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 303(2), 3(5) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम व सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उप अधीक्षक अप्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यात पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर,पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड,पोलीस अंमलदार सुरेश पांचाळ,कल्याणकर,गवेंद्र सिरमलवार यांचा समावेश होता. दरम्यान, गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उपसा रोखण्यासाठी पोलिसांकडून पुढील काळातही अशाच कडक कारवाया करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
