धुळे-भुसावळ एसटीचा भीषण अपघात:ब्रेक निकामी, चाकेही निखळली; 3 किमीपर्यंत मृत्युचा थरार, 15 प्रवासी जखमी
![]()
धुळ्याहून भुसावळकडे निघालेल्या एका एसटी बसला झालेल्या भीषण अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे अनियंत्रित झालेली बस तब्बल ३ किलोमीटरपर्यंत मृत्यूच्या छायेखाली धावत होती. अखेर रस्त्यालगतच्या सुरक्षा कठड्याला बस धडकल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात चालक आणि वाहक दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे-भुसावळ एसटी बस पारोळा येथून सुटल्यानंतर एरंडोलजवळील धारागीर गावाजवळ आली असताना, बसच्या मागील बाजूने मोठा खळखळ आवाज येऊ लागला. काही क्षणांतच चालकाला समजले की बसचे ब्रेक पूर्णपणे निकामी झाले आहेत. बस अनियंत्रित झाल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच आक्रोश आणि आरडाओरडा सुरू झाला. सुमारे ३ किलोमीटरपर्यंत ही बस कधी रस्त्यावर तर कधी रस्त्याखाली झिग-झॅग पद्धतीने धावत होती. चाके निखळली, पण कठड्याने वाचवले हा थरार सुरू असतानाच बसची काही चाके निखळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तांत्रिक बिघाड इतका भीषण होता की बस कधीही पलटी होऊ शकली असती. मात्र, चालकाने शर्थीचे प्रयत्न करत बस रस्त्यालगतच्या सुरक्षा कठड्यावर नेऊन धडकवली. या धडकेमुळे बस थांबली आणि ५० ते ६० प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले. जखमींवर उपचार सुरू या भीषण अपघातात बसचा चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारानंतर तातडीने धुळे येथे हलवण्यात आले. तसेच, १० ते १५ जखमी प्रवाशांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. बहुतांश प्रवाशांना मुका मार लागला असून, सुदैवाने कोणाचीही प्रकृती चिंताजनक नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. महामंडळाच्या कारभारावर प्रवाशांचा संताप “बस पारोळ्याहून निघाल्यापासूनच आवाज करत होती, पण तरीही ती चालवली गेली. जर तो सुरक्षा कठडा नसता, तर आज मोठी दुर्घटना घडली असती,” अशी संतप्त प्रतिक्रिया अपघातातील प्रवाशांनी दिली आहे. बसची चाके निखळणे आणि ब्रेक फेल होणे यावरून एसटी महामंडळाच्या कार्यशाळेतील बस देखभालीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एसटी महामंडळाच्या या ‘खटारा’ बसगाड्या प्रवाशांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप आता प्रवाशांकडून केला जात आहे. या तांत्रिक बिघाडाबाबत महामंडळ कोणती कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
