Marathi Compulsory | रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारने घेतला मोठा निर्णय

0
sayali-web-2026-04-29T152246.707.webp.webp


Marathi Compulsory | राज्यातील हिंदी भाषिक आणि परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मराठी शिकण्यासाठीची विशेष ‘प्रशिक्षण पुस्तिका’ प्रकाशित केली. तसेच, संघटनांनी केलेल्या विनंतीचा विचार करून चालकांना मराठी शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मराठी शिकण्यासाठी ‘डिजिटल’ आणि ‘ऑडिओ’ पुस्तिका

परिवहन विभागाने तयार केलेल्या या पुस्तिकेत दैनंदिन व्यवहारातील महत्त्वाची १५ ते १६ वाक्ये देण्यात आली आहेत. ही पुस्तिका केवळ छापील स्वरूपात नसून ती मोबाईलवरही उपलब्ध असेल. पुस्तिकेवर एक ‘बारकोड’ (Barcode) देण्यात आला असून, तो स्कॅन केल्यास चालकांना ऑडिओ (Audio) स्वरूपात मराठी उच्चार ऐकता येतील. “मराठी भाषा अत्यंत प्रेमळ असून केवळ ४८ तासांत कोणीही ती आत्मसात करू शकतो,” असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला. ही पुस्तिका १ मे पासून राज्यातील सर्व आरटीओ (RTO) कार्यालयांमध्ये विनामूल्य उपलब्ध करून दिली जाईल.

चालक संघटनांवर सोपवली जबाबदारी

ज्या संघटनांनी मराठी शिकण्यासाठी वेळ मागितला होता, त्यांना सरकारने आता स्पष्ट बजावले आहे. संघटनांनी आपल्या कार्यालयात, शाखांमध्ये किंवा हॉल भाड्याने घेऊन हिंदी भाषिक चालकांना मराठीचे धडे द्यावेत. १ मे ते १५ ऑगस्ट या कालावधीत आरटीओ अधिकारी प्रत्येक विभागात जाऊन चालकांच्या भाषेच्या ज्ञानाची तपासणी करतील. तसेच, चालक नियमानुसार वाहन चालवतोय की नाही, याचीही पडताळणी केली जाईल. १५ ऑगस्टपर्यंत केवळ भाषेच्या कारणावरून कोणावरही कारवाई केली जाणार नाही, मात्र त्यानंतर नियमांचे पालन करणे अनिवार्य असेल.

महाराष्ट्रात राहायचे तर मराठी हवीच!

“महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल आणि इथे राहायचे असेल, तर मराठी भाषा येणे अनिवार्य आहे,” असे परखड मत प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. प्रशासनासोबतच आता प्रवाशांचीही जबाबदारी आहे की, त्यांनी रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये बसल्यावर चालकांशी मराठीत संवाद साधावा, जेणेकरून त्यांना भाषा शिकण्यास मदत होईल. या मोहिमेमुळे रिक्षा-टॅक्सी प्रवासादरम्यान होणारे भाषिक अडथळे दूर होऊन संवाद अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

News Title: Marathi Compulsory For Auto Taxi Drivers In Maharashtra Pratap Sarnaik Statement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed