पाणीटंचाई व घरकुल आढावा बैठकीस गैरहजर राहणे भोवले:तीन ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित, सीईओ विवेक गायकवाड यांचे आदेश

0
whatsapp-image-2026-04-29-at-15722-pm_1777451490.jpeg




हिंगोली पंचायत समितीमध्ये आयोजित पाणीटंचाई आढावा बैठक व घरकुल योजनेच्या बैठकीस गैरहजर राहणाऱ्या तीन ग्रामसेवकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश बुधवारी तारीख 29 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी काढले आहे. या कारवाईमुळे ग्रामसेवक संघटनेत एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली जिल्ह्यात सध्या पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या पाणी प्रश्न संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी पंचायत समिती मधून आढावा बैठक घेऊन पाणी टंचाईची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय घरकुल योजनेच्या कामाला गती देण्यासाठी ग्रामसेवकांची बैठक बोलावली जात आहे. या बैठकीत गावनिहाय आढावा घेऊन पाणीटंचाईवर काय उपाययोजना करता येईल याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या जात आहेत. दरम्यान हिंगोली पंचायत समिती कार्यालयामध्ये मंगळवारी ता 28 बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, गटविकास अधिकारी माया वानखेडे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी गायकवाड यांनी हिंगोली तालुक्यातील गावनिहाय पाणीटंचाईचा आढावा घेतला तसेच त्या ठिकाणी पाण्यासाठी काय पर्यायी उपाययोजना केल्या जातील याची माहिती घेऊन त्याबाबतच्या सूचना दिल्या. याशिवाय घरकुल योजनेची कामे संथ गतीने का सुरू आहेत त्याबाबत काय अडचणी आहेत याची माहिती घेऊन त्या अडचणी सोडवण्याबाबत आवश्यक त्या सूचनाही दिल्या. दरम्यान या बैठकीस हिंगोली तालुक्यातील सर्व ग्रामसेवक उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र ग्रामसेवक एल. एम. केंद्रे, डी. आर राठोड, आर.एस. नागरगोजे हे गैरहजर होते. याशिवाय तीन ग्रामसेवक बैठकीसाठी एक तास उशिराने हजर झाले होते. हिंगोली तालुक्यातील पाणीटंचाईच्या महत्त्वाच्या प्रश्नावर दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून ग्रामसेवक केंद्रे, राठोड, नागरगोजे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी बुधवारी ता 29 काढले आहे. याशिवाय उशिराने येणाऱ्या तीन ग्रामसेवकांच्या एक वेतनवाढ बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या कारवाईमुळे ग्रामसेवक संघटनेतून खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed