उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडून उमेदवार नसणार:अंबादास दानवे विधान परिषदेवर जाणार, आदित्य ठाकरे यांची घोषणा
![]()
विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा अधिकृत चेहरा कोण असेल, यावरून सुरू असलेल्या सस्पेन्सचा अखेर पडदा फासला आहे. स्वतः उद्धव ठाकरे या निवडणुकीत उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली. महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे विधान परिषदेच्या रिंगणात उतरणार असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच हा निर्णय घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेत्यांनीही उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवार व्हावे, अशी भूमिका वारंवार मांडली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाऐवजी पक्षातील आक्रमक चेहरा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवारी नाकारल्यामुळे आता महाविकास आघाडीची रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसला हा निर्णय मान्य आहे का? या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कोणती भूमिका घेतली जाते? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. सत्ताधारी महायुतीकडे असलेल्या संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर, एका सुरक्षित जागेसाठी दानवे यांच्या रूपाने अनुभवी चेहरा देऊन ठाकरेंनी सावध पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.
