रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका:आता जबाबदारी युनियनची; परिवहन मंत्री सरनाईकांच्या संघटनांना सूचना

0
db-temp-cover-marathi-2026-04-29t140241864_1777452918.jpg




महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक रिक्षा आणि टॅक्सी चालकाला मराठी भाषेचे ज्ञान असणे आता अनिवार्य होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत परप्रांतीय चालकांसाठीच्या ‘मराठी मार्गदर्शन पुस्तिकेचे’ प्रकाशन करण्यात आले. येत्या १ मे पासून ही पुस्तिका राज्यातील सर्व आरटीओ (RTO) कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार असून, १५ ऑगस्टपर्यंतची मुदत चालकांना देण्यात आली आहे. या निर्णयाबाबत माहिती देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “शशांक राव, संजय निरुपम, हाजी शराफत शेख अली यांच्यासह अनेक संघटनांनी आमच्याकडे वेळ मागितली होती. हिंदी भाषिक चालकांना मराठी शिकण्यासाठी अवधी हवा, अशी त्यांची भूमिका होती. आम्ही ती वेळ दिली आहे, पण आता या संघटनांची जबाबदारी वाढली आहे. त्यांनी आपल्या कार्यालयांत किंवा हॉल भाड्याने घेऊन चालकांना मराठी शिकवावे, असे आमचे स्पष्ट मत आहे.” १५ ऑगस्टपर्यंत ‘नो दंड’; त्यानंतर कारवाईचा बडगा परिवहन विभागाने या मोहिमेसाठी एक विशेष वेळापत्रक आखले आहे. १ मे ते १५ ऑगस्ट या कालावधीत ही मोहीम राबवली जाईल. या काळात चालकांना मराठी भाषेचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी सवलत दिली जाईल. मराठी भाषेवरून १५ ऑगस्टपर्यंत कोणताही दंड आकारला जाणार नाही. मात्र, तो चालक कायदेशीर कागदपत्रांनुसार रिक्षा चालवतोय की नाही, याची तपासणी आरटीओ अधिकारी करतील.१६ ऑगस्टनंतर आरटीओकडून होणाऱ्या तपासणीत भाषेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाईचे संकेत परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत. सरनाईकांचे मराठी प्रवाशांना ‘साकडे’ प्रताप सरनाईक यांनी केवळ चालकांनाच नव्हे, तर मराठी प्रवाशांनाही एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “आपण जर मराठी भाषेवर मनापासून प्रेम करत असू, तर रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये बसल्यानंतर समोरचा चालक कोणीही असो, त्याच्याशी मराठीतच बोला. जेव्हा महाराष्ट्रातील मराठी माणूस ही ठाम भूमिका घेईल, तेव्हाच आमच्या या मोहिमेला खरे यश मिळेल.” मंत्रिमंडळाचा पाठिंबा आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत परिवहन विभागाने घेतलेल्या या भूमिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी कौतुक करत पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. भाषेच्या मुद्द्यावरून होणारे वाद टाळून चालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही पुस्तिका मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed