भाजप विरुद्ध शिवसेना महायुतीत नवा संघर्ष:भूमाफिया असल्याच्या आरोपांनंतर पलटवार; सरनाईक गटाकडून मेहतांना नोटीस
![]()
भाईंदर पाडा येथील भूखंड वादावरून सत्ताधारी महायुतीत नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सरनाईक यांच्या विहंग समूहाने मेहतांना कायदेशीर नोटीस बजावली असून, बदनामीकारक आणि खोटी विधाने तात्काळ थांबवावीत, अशी मागणी केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असून, या वादाचे पडसाद मिरा-भाईंदर परिसरात उमटू लागले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात नरेंद्र मेहता यांनी सोशल मीडियावर केलेल्या आरोपांपासून झाली. त्यांनी भाईंदर पाडा येथील सुमारे 2439 चौरस मीटर जमिनीपैकी 1219 चौरस मीटर जमीन मंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बळकावल्याचा गंभीर आरोप केला होता. या जमिनीवर स्थानिक भूमिपुत्रांचे हक्क असल्याचे सांगत मेहतांनी हा केवळ जमीन वाद नसून स्वाभिमानाचा प्रश्न असल्याचे म्हटले होते. गंगाधर भोईर, सुमती तंगडी, शांताबाई भोईर यांच्यासह अनेक कुटुंबांची जमीन बळकावल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपांनंतर मेहतांनी आपल्या समर्थकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आणि त्यानुसार त्यांनी कासारवडवली पोलिस ठाण्यात जाऊन प्रताप सरनाईक यांच्याविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली. या घटनेमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मेहतांनी पत्रकार परिषदेत सरनाईक यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना सर्वात मोठे भूमाफिया, असे संबोधले. मराठी माणसाच्या हिताची भाषा करणारे सरनाईक प्रत्यक्षात भूमिपुत्रांनाच बेघर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. दुसरीकडे, या सर्व आरोपांवर प्रताप सरनाईक किंवा त्यांच्या कार्यालयाकडून तातडीने प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र, आता विहंग समूहाकडून मेहतांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटिशीत मेहतांनी केलेली विधाने खोटी आणि बदनामीकारक असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच ही विधाने राजकीय हेतूने आणि विकासकामांवर दबाव आणण्यासाठी केली गेली असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा वाद आता केवळ राजकीय न राहता कायदेशीर स्वरूप धारण करत असल्याचे दिसत आहे. या वादाची पार्श्वभूमी पाहिली तर, यापूर्वीही सरनाईक यांनी मेहतांवर गंभीर आरोप केले होते. मिरा-भाईंदर परिसरातील सुमारे 30 टक्के जमीन मेहता यांच्या ताब्यात असल्याचा दावा त्यांनी एका व्हिडिओत केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. नंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले होते की, सूर्या पाणीपुरवठा योजना आणि मेट्रो प्रकल्प राबवताना मेहता यांच्या कुटुंबीयांच्या जागेमुळे अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे हा मुद्दा लक्षात आणून देण्यासाठी त्यांनी ते विधान केल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. दोन्ही नेत्यांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता दरम्यान, भाईंदर पाडा येथील जमीन वादावरून स्थानिक नागरिकांनी आणि भाजप आमदारांनी कासारवडवली पोलिस ठाणे तसेच ठाणे महानगरपालिकेत तक्रारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सत्ताधारी आघाडीतील दोन नेत्यांमध्ये उघडपणे आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. पुढील काही दिवसांत या प्रकरणात कोणते नवे वळण येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
