वीटभट्टीवरील मजुरांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर:मेळघाटमधील विद्यार्थ्यांचे प्रशासनाला साकडे, आंदोलनाचा इशारा, मागण्यासाठी कार्यालयात मारली धडक‎

0
transfar_240_177737529469f0983eeee99_melghatvidhar.jpg




प्रतिनिधी | अमरावती रोजगाराच्या शोधात अमरावतीच्या वीट भट्टीवर कामासाठी येणाऱ्या मेळघाटातील मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी ‘खोज’ संस्थेचे संस्थापक ॲड. बंड्या साने, ब्रदर जोस व त्यांचे इतर सहकारी यांनी पुढाकार घेतला असून सदर विद्यार्थ्यांसाठी वीट भट्टीवर शाळा उघडावी, अशी मागणी केली आहे. मजुरांच्या मुलांसाठी ते ज्या ठिकाणी काम करतात, त्याच ठिकाणी शाळा उघडावी, अशी कायद्यात तरतूद आहे. परंतु दरवर्षी या मुलांची परवड होते. त्यांना त्या ठिकाणी शेड किंवा शालेय सामग्री उपलब्ध करुन दिले जाते ना त्यांच्यासाठी शिक्षकांची उपलब्धता करुन दिली जाते. त्यामुळे मजूर आई-वडिलांसोबत वीट भट्टीवर आलेल्या या मुलांना शिक्षणाचे कोणतेही धडे मिळत नाही. नेमका हाच मुद्या संबंधितांना पुढे केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या मंडळीने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मेळघाटचे प्रकल्प संचालक आणि आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त यांच्या भेटी घेतल्या. विशेष म्हणजे या भेटीवेळी मजुरांची मुलेही त्यांच्यासोबत होती. मेळघाटमध्ये मुख्यत्वे आदिवासी आणि कोरकू नागरिक आहेत. मजुरी हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. मात्र दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत त्यांना तेथे काम उपलब्ध होत नाही. मनरेगाची कामे आहेत, असा दावा प्रशासन करित असले तरी वास्तविकता याहून उलट आहे. त्यामुळे नाईलाजास्तव या आदिवासी-कोरकू मजुरांना अमरावतीत येऊन वीटभट्ट्यांवर काम करावे लागते. घरात मुलांची काळजी घेण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच असल्याने येताना ते आपली मुलेही सोबत घेऊन येतात. ..तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठाण मांडणार स्थानिक पातळीवर रोजगार नाही म्हणून वीट भट्टीवर कामासाठी येणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी शासनाने त्यांच्या कामाच्या ठिकाणी शिक्षणाची सोय करावी, अशी तरतूद आहे. परंतु ती वेळेत केली जात नाही, त्यामुळे दरवर्षी तेथील सामाजिक कार्यकर्त्यांना प्रशासनाशी भांडावे लागते. यावर्षीही तशीच स्थिती आहे. त्यामुळे संबंधितांनी त्या विद्यार्थ्यांसह अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठाण मांडण्याचे आंदोलन करु, असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed