वादळामुळे वीजपुरवठा खंडित; नागरिकांनी जागूनच काढली रात्र:महावितरण अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांचा संताप – खांब जमीनदोस्त
![]()
प्रतिनिधी | अंजनगाव सूर्जी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हंतोडा येथे सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. यामुळे गावातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. वेळीच दुरुस्ती झाली असती. तर कदाचित नागरिकांचा त्रास टळला असता. त्यामुळे महावितरणच्या ढिसाळ नियोजनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सोमवारी अमरावती जिल्ह्याचे तापमान ४६ अंश सेल्सिअसहून अधिक होते. त्यामुळे नागरिक दिवसभर उकाड्यामुळे त्रस्त झाले होते. सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. वादळी वाऱ्यासह पावसाची सर आली. या वादळाचा जोर इतका होता की अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. लखाड, शिरजगाव, दहीगाव, अंजनगाव सुर्जी, हंतोडा, चिंचोली, रहीमापूर आणि मुऱ्हा या भागात जोरदार वारे व पावसाने हजेरी लावली. हंतोडा येथे विद्युत खांब कोसळले. त्यामुळे संपूर्ण गावाचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. या घटनेनंतर गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक रहिवासी व भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष रवी गोळे यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी “सध्या कर्मचारी येऊ शकत नाहीत,” असे उत्तर दिले. त्यामुळे नाईलाज झाला. याबाबत गोळे यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली आहे. रात्रभर वीज नसल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या संपूर्ण प्रकारामुळे महावितरण कंपनीच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला.
