विधानपरिषदेसाठी अर्जाचे फक्त दोन दिवस; उद्धव ठाकरेंचा नकार कायम:निवडणुकीत मविआची कोंडी; उमेदवारावर अद्याप एकमत नाही

0
730-x-548-new-2026-04-16t155046175_1777350955.jpg




महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महाविकास आघाडीत उमेदवार ठरवण्यावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. 12 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ आली असून, केवळ दोन दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल, याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. या सगळ्या घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका निर्णायक ठरत आहे. माहितीनुसार, महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची इच्छा आहे की, ही निवडणूक उद्धव ठाकरे यांनीच लढवावी. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या दोन्ही पक्षांकडून ठाकरेंना आग्रह करण्यात येत आहे. मात्र, स्वतः उद्धव ठाकरे या निवडणुकीत उतरायला फारसे उत्सुक नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे मविआसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. ठाकरे गटातील नेतेदेखील उद्धव ठाकरेंचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मते, विधानपरिषदेत ठाकरेंची उपस्थिती आघाडीसाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र, ठाकरेंनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना तयार करण्याचे प्रयत्न सुरू राहणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, जर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवण्यास नकार कायम ठेवला, तर त्यांच्या पक्षातून इतर काही नावांची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊत, राजन विचारे आणि वैभव नाईक यांचा समावेश आहे. या नेत्यांमध्येही उमेदवारीसाठी स्पर्धा असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अंतिम क्षणी कोणता चेहरा पुढे येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडूनही काही नेत्यांची नावे चर्चेत आहेत. बाळासाहेब थोरात, मुझफ्फर हुसेन, सचिन सावंत आणि राजेश राठोड यांची दावेदारी पुढे येत आहे. त्यामुळे मविआत केवळ एका जागेसाठी अनेक पर्याय समोर असल्याने एकमत साधणे कठीण झाले आहे. या सर्व नावांचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दोन दिवसांत मविआचा अंतिम निर्णय संख्याबळाच्या गणितानुसार या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड असल्याचे दिसते. एका उमेदवाराला विजयासाठी 29 मतांची गरज असून, महायुतीला सुमारे 8 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला केवळ एकच जागा मिळू शकते. त्यामुळे या एका जागेसाठी योग्य उमेदवार निवडणे मविआसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, भाजपकडून राम सातपुते, संदीप जोशी, केशव उपाध्ये, माधवी नाईक आणि रणजितसिंह निंबाळकर यांसारख्या नावांची चर्चा सुरू आहे. आता पुढील दोन दिवसांत मविआचा अंतिम निर्णय काय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed