बडनेरासह दाभा येथे बौद्धाचार्य श्रामनेर,समता सैनिक दलाचे शिबिर १८ मेपासून:भारतीय बौद्ध महासभेचे आयोजन,शिबिरात दररोज चार विषयांवर मार्गदर्शन करणार‎

0
240_177720153769edf1816cbff_babadahebambed.jpg




प्रतिनिधी | अमरावती भारतीय बौद्ध महासभेची बडनेरा शाखा व नांदगाव खंडेश्वर तालुका शाखेच्यावतीने बडनेरा व दाभा येथे बौद्धाचार्य श्रामनेर शिबिर आणि समता सैनिक दल शिबिरांचे आयोजन केले आहे. ही शिबिरे १८ ते २७ मे या काळात होतील. हे शिबिर कपिल मंडळ बुद्ध विहार, अशोक नगर, बडनेरा येथे केले आहे. या शिबिरात सुमारे ४० ते ५० श्रामनेर सहभागी होणार असून, त्यांच्या निवास व दैनंदिन गरजांची व्यवस्था करणार आहे. शिबिरादरम्यान दररोज चार विषयांवर मार्गदर्शन होणार असल्याने १० दिवसांत ४० विषयांवर शिक्षण दिले जाणार आहे. या शिबिरात पूज्य भंते शाक्यपुत्र राहुल (राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, संस्थापक अध्यक्ष, जेतवन धम्म संस्कार केंद्र, अकोला,) पूज्य भंते नागसेन व इतर भंतेगण यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. केंद्रीय शिक्षक युवराज मोरे (नांदेड) यांचीही उपस्थिती राहणार असून, ते शिबिरार्थींना प्रशिक्षण देणार आहेत. याच अनुषंगाने समता सैनिक दलाचे दोन दिवसीय शिबिर १६ व १७ मे रोजी बडनेरा व दाभा ता. नांदगाव खंडेश्वर येथे आयोजित केले आहे. या शिबिरात इच्छुक युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक उपस्थित राहणार आहेत. समता सैनिक दलात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी सकाळी १० वाजता शिबिरस्थळी उपस्थित राहावे, असे कळवण्यात आले आहे.दोन्ही शिबिरांचा एकत्रित समारोप व धम्म मेळावा त्यागमूर्ती आई रमाई यांच्या स्मृतिदिनी, बुधवारी २७ मे रोजी दुपारी १ वाजता कपिल बुद्ध विहार परिसर, अशोक नगर, बडनेरा येथे होणार आहे. या कार्यक्रमाला पूज्य भंतेगण, केंद्रीय शिक्षक, एम. डी. सरोदे (केंद्रीय प्रशिक्षण विभाग उपप्रमुख) प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. संस्कारमय समाज निर्मितीसाठी आयोजित या शिबिरांत शिबिरार्थींनी सहभागी व्हावे, तशी नोंदणी संबंधित पदाधिकाऱ्यांकडे करावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश बोरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed