शिक्षण क्षेत्रामधील प्रसारित भ्रामक जाहिरातीवर आळा घालण्याची मागणी:तहसीलदार यांच्यामार्फत शिक्षण उपसंचालकांना ग्राहक पंचायतचे निवेदन‎

0
240_177721571969ee28e7a634f_shikshanjahira.jpg




प्रतिनिधी | तिवसा शिक्षण क्षेत्रात वाढत्या भ्रामक जाहिरातीमुळे विद्यार्थी व पालकांची अक्षरशः दिशाभूल करून आर्थिक लूट होत असल्याने प्रकारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने २४ एप्रिल रोजी तिवसा तहसीलदार यांच्यामार्फत शिक्षण उपसंचालक यांच्याकडे एका निवेदनातून करण्यात आली. शासनाने २५ डिसेंबर २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकांच्या अनुषंगाने भ्रामक जाहिराती व दिशाभूल करणाऱ्या शाळाविरोधात तातडीने कारवाई करावी, अशी आग्रही भूमिका अखिल भारतीय ग्राहक संघटनेने मांडली आहे. अनेक शैक्षणिक संस्था, इंग्लिश स्कुल या “इंटरनॅशनल’ “ग्लोबल’ किंवा “सीबीएससी’ पॅटर्न अशा आकर्षक शब्दांचा वापर करून पालकांची दिशाभूल करतात. मात्र, प्रत्यक्षात अशा संस्थांकडे संबंधित मान्यता नसल्याने अनेक वेळा समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहक पालकांची शैक्षणिक व आर्थिक लूट होते. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने याबाबत आवाज उठवला आहे. राज्यात अनेक शाळा व खासगी कोचिंग संस्था दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करत आहेत, त्याचप्रमाणे १०० टक्के निकाल किंवा यशाची हमी देणाऱ्या जाहिरातींमधून विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क वसूल केली जाते. भ्रामक नावाचा वापर करणाऱ्या शाळांची तात्काळ चौकशी करून मान्यता नसलेल्या संस्थांवर दंडात्मक कारवाई करावी, सर्व शाळांची अधिकृत माहिती सर्व पोर्टलवर उपलब्ध करणे किंवा कोचिंग क्लासेसच्या जाहिरातीवर नियंत्रण आणावे, याबाबत तक्रार नोंदविण्यासाठी सुलभ ऑनलाइन व हेल्पलाइन व्यवस्था करण्यात यावी, आदी मागण्यांबाबतचे निवेदन तिवसा तहसीलदार आशिष नागरे यांना अखिल भारतीय ग्राहक पंचायत तिवसा तालुका यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तिवसा तालुकाध्यक्ष गुणवंत देवतारे, वैभव भोंबे, रावसाहेब बाखडे, भिमराव बारी, घोंगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed