रेल्वे उड्डाणपुलाची किंमत ५४ वरून १०४ कोटींवर पोहोचली:९ वर्षांपासून रखडला आहे न्यू तापडिया नगरातील पूल
![]()
प्रतिनिधी | अकोला गत ९ वर्षांपासून रखडलेला न्यू तापडिया नगरातील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची किंमत ५४ कोटींवरून १०४ कोटी झाल्याने राजकारण तापले आहे. सत्ताधारी भाजप व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जुंपली आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीका-टिप्पणी करण्यात येत आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर टीका करणारे फलकही लावले. रेल्वे उड्डाणपुलासाठी १०४ कोटींचा निधी म्हणजे विकास नव्हे, तर अपयशाचे प्रमाणपत्र आहे, अशी टीका शिवसेनेने केली. यश-अपयशाचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार शिवसेना नेत्यांना कोणी दिला, असा प्रश्न भाजपने केला. न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाचा प्रश्न गत आठ वर्षांपासून प्रलंबित आहे. खरप, न्यू तापडिया नगरात जाण्यासाठी रेल्वे क्रॉसिंग असल्याने गेट बंद असल्यास नागरिकांना ताटकळत राहावे लागते. पुलासाठी ५० कोटींच्या कामाला प्रशासकीय मान्यता २०१६ मध्ये देण्यात आली होती. आतापर्यंत ४८.५० लाख खर्च झाले. मार्च महिन्यात ५४ कोटी मंजूर झाल्याचे भाजपकडून जाहीर करण्यात आले. एकूण १०४ कोटी ७९ लाखांच्या कामाला सुधारित मान्यता देण्यात आली. त्यामुळे ६० हजारांवर नागरिकांना सुखमय प्रवासाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. यश-अपयशाचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी जि.प. सदस्य गोपाल दातकर यांना कोणी प्रदान केला, असा प्रश्न भाजपचे माजी नगरसेवक अभियंता सागर शेगोकार यांनी केला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पाठपुरावा केल्याने रेल्वे उड्डाणपूल मंजूर झाला. न्यू तापडिया नगर परिसर अकोला शहरातील उपनगर म्हणून विकसित होत आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर केंद्राकडे मागणी करण्यात आली. त्यांनी उड्डाणपुलासाठी निधी मंजूर केला. रेल्वे विभागासह १५ मान्यता मंजूर झाल्यानंतर काम सुरू झाले. सरकारच्या सीआरएसअंतर्गत काम केल्यानंतर निधीत वाढ करता येत नाही. यासाठीच राज्य सरकारकडे मागणी करून नवीन प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या तीन वर्षांच्या काळात निधी मिळाला नाही. परिणामी खर्चात वाढ झाली. त्यामुळे हे अपयश उद्धव ठाकरे सेनेचे असून, खर्चवाढीसाठी ते जबाबदार असल्याचा आरोप सागर शेगोकार यांनी केला. न्यू तापडिया नगरातील रेल्वे उड्डाणपुलासाठी शासनाने वाढीव ५४ कोटी मंजूर केले. मात्र निधी म्हणजे विकास नव्हे, तर तुमच्या अपयशाचं महागडे प्रमाणपत्र आहे, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. गत नऊ वर्षांपासून न्यू तापडिया नगरातील रेल्वे पूल रखडला आहे. या भागातून ये-जा करणाऱ्या असंख्य नागरिकांना अक्षरशः नरकयातना भोगाव्या लागत असताना दुसरीकडे भाजप नेते शासनाने मंजूर केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील ५४ कोटींच्या निधीवरून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत आहेत. २०१६ मध्ये ज्या कामाची किंमत केवळ २६ कोटी होती, ती आता १०४ कोटींपेक्षा जास्त झाली आहे. पुलाचे काम निर्धारित वेळेत निकाली काढण्यात भाजपच्या लोकप्रतिनिधींना अपयश आल्याची टीका जिल्हाप्रमुख दातकर यांनी केली आहे. १० वर्षांच्या विलंबामुळे पुलाचा खर्च वाढला. हा वाढलेला बोजा म्हणजे प्रशासकीय नाकर्तेपणाचा पुरावा आहे, अशी टीकाही त्यांनी केली. या पुलाबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाने थेट रेल्वेपुलाजवळ आंदोलनही केले होते. ..ही तर क्रूर थट्टा : एक उड्डाणपूल पूर्ण करायला ज्यांना १० वर्षे लागतात. खर्च दुप्पट होतो. हेच भाजप नेते २०४७ च्या ”विकसित भारता”च्या गप्पा मारून जनतेची क्रूर थट्टा करत आहेत. अकोल्यातील रस्ते, गटारे आणि पुलांची अवस्था पाहता राज्य शासनाकडून प्राप्त निधीवरून श्रेय लाटणे कितपत योग्य, असा सवाल जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी उपस्थित केला आहे. असा आहे खेळ आकडेवारीचा खेळ आणि जनतेची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला आहे. रेल्वे पुलाच्या कामाचा खर्च २१ कोटींवरून थेट ४८ कोटी झाला. जीएसटीचा बोजा जो आधी शून्य होता, तो आता १५ कोटींवर गेला आहे. आकस्मिक निधीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची वाढ झाली आहे. जर हे काम वेळेत पूर्ण झाले असते, तर आज ५४ कोटी रुपये वाचले असते. हा पैसा शहरातील इतर रस्ते किंवा पाणी पुरवठ्यासाठी वापरता आला असता.
