‘किसान ड्रोन ऑपरेटर' प्रशिक्षणामधून महिला हायटेक:ग्रामीण भागातील महिलाही आता ड्रोन अगदी सहज हाताळत आहेत,सामान्य महिलांनी गाठले नवे क्षितिज‎

0
240_177721531869ee27563050b_samprada.jpg




प्रतिनिधी । अमरावती कृषी क्षेत्रात सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचे वारे वाहत असून, त्यात ड्रोन तंत्रज्ञान क्रांती घडवून आणत आहे. हेच तंत्रज्ञान आता ग्रामीण भागातील महिलांच्या हातात विसावले असून, अमरावती जिल्ह्यातील महिलांनी ‘ड्रोन ऑपरेटर’ म्हणून नवे क्षितिज गाठले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि डाखरे महाराज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘किसान ड्रोन ऑपरेटर’ प्रशिक्षण कार्यक्रमातून ८३ महिलांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करून स्वावलंबनाकडे पाऊल टाकले आहे. या उपक्रमातंर्गत डाखरे महाराज फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक संप्रदा डाखरे यांनी ग्रामीण महिलांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण दिले. सन २०२४-२५ व २०२५-२६ या कालावधीत ‘किमान कौशल्य विकास कार्यक्रम’ अंतर्गत हे प्रशिक्षण प्रामुख्याने भातकुली तालुक्यातील महिलांसाठी आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणादरम्यान महिलांना ड्रोनचे तांत्रिक ज्ञान, त्याचे विविध घटक, ड्रोन उड्डाणाचे तंत्र (फ्लाईंग टेक्निक्स) आणि कृषी क्षेत्रात औषध फवारणीसाठी ड्रोनचा प्रभावी वापर कसा करावा, याचे सखोल सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, उड्डाणादरम्यान पाळावयाचे सुरक्षा नियम आणि शासकीय मार्गदर्शक तत्त्वांचीही माहिती देण्यात आली.या अभिनव उपक्रमाला जिल्हा कौशल्य विकास केंद्रामार्फत मार्गदर्शन आणि तांत्रिक सहकार्य लाभले. प्रशिक्षणाच्या दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी प्रत्यक्ष केंद्राला भेट देऊन प्रशिक्षणार्थी महिलांशी संवाद साधला आणि ग्रामीण भागातील महिलांचा हा तांत्रिक आत्मविश्वास पाहून उपक्रमाचे कौतुक केले. ड्रोन हातळण्याचे प्रशिक्षण घेण्यासोबतच त्यांचा कशाप्रकारे वापर करायचा. ते कशाप्रकारे व किती उंचीवर उडवायचे. तसेच शेतात फवारणीसोबतच निगराणीसाठी त्याचा कशाप्रकारे वापर करता येतो, याबाबत इत्थंभूत माहिती, मार्गदर्शन व प्रशिक्षण ग्रामीण भागातील महिलांना करण्यात आल्यामुळे त्यांच्या आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या महिलाही इतर महिलांना ड्रोन हाताळण्याचे प्रशिक्षण देऊ शकतात. या नव्या तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात किटकांमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळणे शक्य झाले आहे. संप्रदा डाखरे प्रशिक्षणामुळे ८३ महिलांना कौशल्य मिळाले असे नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेत एक नवीन रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. आज या महिला शेतीत आधुनिक ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करण्यासाठी सज्ज झाल्या असून, त्यांच्या आत्म विश्वासात वाढ झाली. शासनाच्या कौशल्य विकास धोरणाला प्रभावी हातभार लावणारा हा प्रकल्प कृषी क्षेत्रात महिलांच्या सहभागाचे एक नवीन आणि आधुनिक उदाहरण ठरला. भविष्यात असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून महिलांना तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणण्याचा मानस संप्रदा डाखरे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed