मणिपूरला सुरक्षा द्या, पश्चिम बंगालमध्ये सशस्त्र दल कशाला?:संजय राऊतांचा पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर घणाघात

0
db-temp-cover-marathi-2026-04-27t100837472_1777266009.jpg




पश्चिम बंगालमधील सुरक्षा दलांचा वापर, मणिपूरमधील हिंसाचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परराष्ट्र धोरण यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे. “निवडणूक जिंकण्यासाठी आणि मतदारांवर दबाव आणण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये लाखो पॅरामिलिट्री फोर्स धाडणारे पंतप्रधान आणि गृहमंत्री मणिपूरमध्ये का जात नाहीत?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे समर्थन करताना संजय राऊत म्हणाले की, जिथे जनतेच्या सुरक्षेसाठी खऱ्या अर्थाने पोलिसांची गरज आहे, तिथे ते नसतात. मात्र जिथे राजकारण करायचे आहे, तिथे सशस्त्र दले तैनात केली जातात. “तुम्ही मणिपूरमध्ये पॅरामिलिट्री फोर्स पाठवा ना! ज्या उत्साहात पंतप्रधान आणि अमित शहांचे मंत्रिमंडळ बंगालमध्ये रॅली काढत होते, तशीच हिंमत त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन दाखवावी. तिथे रॅली काढा आणि लोकांना धीर द्या. पण ते तसे करणार नाहीत, कारण सध्याची लोकशाही केवळ निवडणुकांपुरतीच मर्यादित राहिली आहे,” असे संजय राऊत म्हणाले. पंतप्रधान मोदींचे ट्रम्प प्रेम डोनाल्ड ट्रम्प यांच्या पार्टीत झालेल्या हल्ल्यावरून पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या चिंतेचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. “खामेनेई यांची हत्या, गाझामधील हजारो मुलांचा मृत्यू किंवा तेहरानमधील शाळेवर झालेला हल्ला, ज्यामध्ये २०० मुली मारल्या गेल्या; यावर पंतप्रधान काहीच बोलले नाहीत. अगदी आपल्याच देशातील मणिपूरमध्ये लोक मारले जात असताना त्यावरही चिंता व्यक्त होत नाही. पण “ज्या ट्रम्प यांनी भारताला गुलाम बनवले. भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानला ताकद दिली, त्यांच्यावर हल्ला झाला की आपल्या पंतप्रधानांना दु:ख होते,” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. विधान परिषद निवडणूक: शिंदे भाजपची मते फोडतील! विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली. एकनाथ शिंदे इतके महान गृहस्थ आहेत की, ते देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी भाजपची मते देखील फोडू शकतात. प्रत्येकाने आपली मते सांभाळावीत. हे मतदान गुप्त असते आणि इथे कुणी कुणाचा नसतो, सगळे पैशांचे व्यवहार आहेत.” विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच आपली अधिकृत भूमिका मांडतील आणि अर्ज भरताना सर्वांना निमंत्रित केले जाईल, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed