शिंदेंच्या शिवसेनेत विधान परिषद उमेदवारीचा पेच!:नीलम गोऱ्हे अन् बच्चू कडूंना पक्षांतर्गत तीव्र विरोध; नव्या चेहऱ्याला संधी देण्याची मागणी
![]()
राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी रंगत आणली आहे. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा धुराळा खाली बसत नाही, तोच आता सर्वांचे लक्ष १२ मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत वेगवान हालचाली सुरू असल्या तरी, संभाव्य उमेदवारांच्या नावावरून पक्षात मोठी नाराजी उफाळून आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विधापरिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांची नावे निश्चित केल्याचे वृत्त होते. मात्र, या दोन्ही नावांना शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळातून प्रचंड विरोध होत आहे. शिवसेनेतील काही ज्येष्ठ मंत्री आणि नेत्यांनी विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली आहे. “ज्याप्रमाणे राज्यसभेवर ज्योती वाघमारे यांच्या रूपाने नवा आणि आक्रमक चेहरा दिला गेला, तोच निकष विधान परिषदेसाठीही लावायला हवा,” असा सूर पक्षात उमटत आहे. जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यापेक्षा निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाव मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे. बच्चू कडूंना उमेदवारी देण्यासाठी ठेवली अट दुसरीकडे, प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्या नावावरूनही शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. “बच्चू कडू यांचा शिवसेनेशी संबंध काय?” असा थेट सवाल काही नेत्यांनी उपस्थित केला आहे. बच्चू कडू यांना जर शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी द्यायची असेल, तर त्यांनी आपली ‘प्रहार जनशक्ती संघटना’ शिवसेनेत विलीन करावी, अशी अट काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवल्याचे समजते. मात्र, या प्रस्तावावर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. संख्याबळ आणि गणिते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे विधानसभेत ५७ आमदारांचे संख्याबळ आहे. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला २८ मतांच्या कोट्याची आवश्यकता असते. या हिशोबाने शिवसेनेच्या दोन जागा सहज निवडून येऊ शकतात. या सुरक्षित जागांवर वर्णी लागावी यासाठी शिवसेनेत इच्छुकांची मोठी गर्दी आहे, म्हणूनच गोऱ्हे आणि कडू यांच्या नावांना विरोध अधिक तीव्र झाला आहे. अंतिम निर्णयाकडे लक्ष विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल असल्याने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आता केवळ दोन दिवसांचा अवधी उरला आहे. ते पक्षातील नाराजी दूर करून जुन्याच नावांवर शिक्कामोर्तब करतात की नव्या चेहऱ्याला संधी देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. निवडणूक कार्यक्रम: महत्त्वाच्या तारखा
