प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांनी घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे:शहरातील सन फार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण
![]()
प्रतिनिधी|अहिल्यानगर
महाराष्ट्र राज्य पोलीस गृह विभाग आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक सुरक्षा आणि नागरी संरक्षण या विषयांतर्गत नागापूर येथील सन फार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आरएसपी (राष्ट्र विद्यार्थी पोलिस) विद्यार्थ्यांसाठी विशेष अग्निशमन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आग विझविण्याचे प्रत्यक्ष धडे देत आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढते तापमान आणि बदलते वातावरण यामुळे विविध प्रकारच्या आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सध्या ३८ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणाऱ्या तापमानामुळे इलेक्ट्रिक वाहनांना आग लागणे, माळरान व डोंगर पेट घेणे, घरगुती विजेच्या शॉर्टसर्किटमुळे किंवा गॅस गळतीमुळे लागणाऱ्या आगी अशा घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आग लागल्यास योग्य उपाययोजना करून ती कशी नियंत्रणात आणावी याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. महानगरपालिका अग्निशामक दलाचे अधिकारी शंकर मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक बंबाच्या साहाय्याने विविध प्रकारच्या आगी आटोक्यात आणण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच विजेचे शॉर्टसर्किट झाल्यास घ्यावयाची खबरदारी, पावसाळ्यात पूरस्थितीत अडकलेल्या नागरिकांना कशी मदत करावी, उंच इमारतींमध्ये आग लागल्यास लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे तंत्र याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रात्यक्षिकामध्ये अग्निशामक दलाचे कर्मचारी शिवदास वांढेकर, सूरज पोकळे, भारत पाडगे, सिद्धार्थ खरात, मयूर लांडगे, अमोल ढमाले, आतेष भापकर, प्रभात साठे आणि नागनाथ नाईक यांनी सहभाग घेत आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना प्रत्यक्ष करून दाखवल्या. कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आरएसपी अधिकारी राजेंद्र धस व शंकर बारस्कर यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. यावेळी अरुण ससे, मंगेश निकम, वैभव काळे, रवींद्र गावडे आणि गुंजाळ मॅडम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी आर.एस.पी. अधिकारी राजेंद्र धस यांनी सर्व अग्निशामक दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण होऊन संकटसमयी धैर्याने व योग्य पद्धतीने प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
