वैजापूर तालुक्यात ५०४० विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा, ३२९ गैरहजर:खंडाळ्यात उन्हाचा तडाखा, वीज खंडितमुळे काही वेळ विद्यार्थ्यांचे झाले हाल
![]()
प्रतिनिधी| खंडाळा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवारी (दि. २६) इयत्ता चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा झाली. वैजापूर तालुक्यात ३५ केंद्रांवर ५ हजार ४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण ५३६९ विद्यार्थी बसले होते. ३२९ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानली जाते. गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते. याआधी पूर्व उच्च प्राथमिक पाचवी व पूर्व माध्यमिक आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती. त्याऐवजी यंदा चौथी व सातवीसाठी परीक्षा घेण्यात आली. तालुक्यातील सर्व केंद्रांवर परीक्षा शांततेत पार पडली. मात्र ११ वाजेनंतर विद्यार्थ्यांची लाहीलाही झाल्याचे चित्र खंडाळ्यातील केंद्रावर दिसले. महावितरणच्या वीजपुरवठ्यात खंड पडत होते. उन्हाचा तडाका ४० अंश सेल्सियसपेक्षा अधिक होता. विद्यार्थी घामाघूम झाले होते. परीक्षा सकाळच्या सत्रात ठेवली असती. तर उन्हाच्या झळा कमी जाणवल्या असत्या. याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही. खंडाळा परीक्षा केंद्र क्रमांक ५१०४५१ येथे एकूण १९९ विद्यार्थी होते. १८५ उपस्थित राहिले. १४ अनुपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी हेमंत उशीर यांनी सांगितले की शिष्यवृत्ती परीक्षेतून विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेची चाचपणी होते. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळवण्याची ही महत्त्वाची स्पर्धा आहे. मेरिट लिस्टमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारकडून तीन वर्षांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. चौथीसाठी प्रतिवर्ष ५ हजार रुपये मिळतात. सातवीसाठी प्रतिवर्ष ७ हजार ५०० रुपये मिळतात. केवळ आर्थिक मदत नाही. विचारक्षमता वाढवणे, पुढील स्पर्धा परीक्षांची शालेय स्तरावर तयारी करून घेणे हा उद्देश आहे. चौथीसाठी २०, सातवीसाठी १५ केंद्रांवर झाली परीक्षा वैजापूर तालुक्यात चौथीची २० केंद्रे होती. सातवीची १५ केंद्रे होती. चौथीच्या परीक्षेला ३०१० विद्यार्थी बसले होते. २८५७ उपस्थित होते. १५३ अनुपस्थित होते. सातवीच्या परीक्षेला २३५९ विद्यार्थी बसले होते. २१८३ उपस्थित होते. १७६ अनुपस्थित होते.
